* प्रा. विजय मोहिते लिखित “पाली भाषा आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकर” ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न
* आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. विजय मोहिते यांच्या ग्रंथाचे ज. वी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन
* पाली भाषा, बुद्ध-धम्म व आंबेडकरी विचारांचे महत्त्व अधोरेखित
मुंबई / रामदास धो. गमरे :- चिपळूण तालुक्यातील दोनवलीचे सुपुत्र, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, प्रख्यात व्याख्याते आणि पाली भाषेचे अभ्यासक प्रा. विजय कृष्णा मोहिते यांचे बहुप्रतीक्षित पुस्तक “पाली भाषा आणि डॉं. बाबासाहेब आंबेडकर” याचा प्रकाशन सोहळा मुंबईत अत्यंत उत्साहात पार पडला. डॉं. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण प्रबोधिनी, अपरांत साहित्य कला प्रबोधिनी आणि प्रियदर्शी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, फोर्ट, मुंबई येथे 29 नोव्हेंबर 2025 रोजी हा सोहळा संपन्न झाला.
* ज. वी. पवार यांच्या अध्यक्षतेने कार्यक्रमाला ऐतिहासिक उंची :- सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक, पँथर नेते ज. वी. पवार होते. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. सधम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार विजय झीमूर यांनी केले.
* पाली भाषेची महानता : ज्ञान, संस्कृती आणि मानवतावादाचा श्वास - ज. वी. पवार :- अध्यक्षीय भाषणात ज. वी. पवार म्हणाले की, पाली भाषा ही केवळ राजभाषा नव्हती, तर त्या युगाच्या प्रज्ञा, विचार, संस्कृती आणि मानवतावादी तत्त्वज्ञानाची मूळ वाहिनी होती. बुद्धांनी पालीचा स्वीकार केला कारण ती लोकमानसाची भाषा होती. ज्ञानाचे लोकशाहीकरण पालीतून झाले. त्यांनी पाली भाषेला अभिजात भाषा, सांस्कृतिक शिलालेख आणि अध्यात्मिक परंपरेचा न संपणारा श्वास असे संबोधले.
* बाबासाहेबांची अपेक्षा - ‘धम्म जाणणारा नव्हे, धम्म जगणारा समाज’ - प्रा. देवडेकर :- मुख्य वक्ते प्रा. आनंद देवडेकर म्हणाले की, बाबासाहेबांनी धर्मांतर म्हणजे क्रांती मानली होती. विचारांची, आचरणाची आणि नैतिकतेची क्रांती. त्यांना असा समाज हवा होता जो धम्माचे ज्ञान, धम्माचे आचरण आणि धम्माचा प्रसार करणारा असेल. त्यांनी उपस्थितांना धम्मकार्य, सामाजिक प्रबोधन आणि बौद्ध मिशनमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
* जगातील सर्वात प्राचीन स्त्रीवादी साहित्य - डॉं. क्रांती गवळी :- उपप्राचार्या डॉं. क्रांती गवळी यांनी सांगितले की, बुद्धांनी स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार आणि आध्यात्मिक समानता त्या काळात क्रांतिकारी होती. पाली साहित्य हे जगातील सर्वात प्राचीन स्त्रीवादी विचारांचे जिवंत उद्गमस्थान आहे. त्यांचे भाषण उपस्थितांना विचारात पाडणारे होते.
या सोहळ्यास जेष्ठ साहित्यिक सयाजी वाघमारे, पत्रकार - साहित्यिक गुणाजी काजीर्डेकर, धम्मलिपी तज्ज्ञ छाया पाटील, अभिनेत्री सावित्री मेधातुल, राजाभाऊ उर्फ रामदास धो. गमरे, संतोष खामगांवकर आणि विविध स्तरावरील कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. मोहितेंची पत्नी वृषाली मोहिते व कन्या मुदिता आणि मेत्ता मोहितेही उपस्थित होत्या. मेत्ता मोहिते यांनी पुस्तकाचे मुखपृष्ठ डिझाइन केले आहे.
* पाली भाषेचे जनतेशी नाते जोडणारे कार्यकर्ते :- आपल्या अभ्यास, भाष्य आणि व्याख्यानांमुळे प्रा. विजय मोहिते आज महाराष्ट्रभर ओळखले जातात. त्यांच्या ग्रंथात पाली भाषेचा बौद्ध परंपरेशी संबंध, बाबासाहेबांच्या संशोधनात पालीचा प्रभाव, बौद्धिक मुक्तीसाठी पालीचे स्थान, धम्मविचारांची मूळ मांडणी यांचा संपन्न आढावा आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ साहित्यिक अॅंड. धम्मकिरण चन्ने यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.


Social Plugin