* डॉं. डी. वाय. एस. फाउंडेशन व दुर्वा एड्युटेनमेंट प्रोडक्शन हाऊसचा कलापूर्ण उपक्रम
डोंबिवली / प्रतिनिधी :- डॉं. डी. वाय. एस. फाउंडेशनच्या सांस्कृतिक विभागांतर्गत आणि दुर्वा एड्युटेनमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली एकपात्री अभिनय स्पर्धा (वर्ष 8 वे) रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी डोंबिवली पश्चिम येथील रेतीभवन बिल्डिंग, दुसरा मजला येथे अत्यंत उत्साहात आणि कलात्मक वातावरणात पार पडली.
या स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील अनेक नवोदित तसेच अनुभवी कलाकारांनी सहभाग घेतला आणि आपल्या एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून सामाजिक, भावनिक, विनोदी व समकालीन विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. प्रेक्षकांची उत्तम दाद आणि रंगमंचीय जिवंतपणा यामुळे स्पर्धेचे वातावरण चैतन्यमय झाले होते.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी व मार्गदर्शक अशोक हंडोरे यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी प्रत्येक कलाकाराचे सादरीकरण बारकाईने पाहून परीक्षण केले. स्पर्धेनंतर परीक्षक अशोक हंडोरे यांनी अभिनयातील भावाभिनय, संवादफेक, देहबोली, वेळेचे भान आणि रंगमंचावरील उपस्थिती या विविध अंगांवर थोडक्यात पण अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे सहभागी कलाकारांमध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण झाले.
डॉं. डी. वाय. एस. फाउंडेशन सांस्कृतिक विभाग व दुर्वा एड्युटेनमेंट प्रोडक्शन हाऊस यांच्या वतीने विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र परीक्षकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच काही कलाकारांना त्यांच्या उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल उत्तेजनार्थ प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना आयोजकांनी विशेष शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे संस्थापक व स्पर्धेचे आयोजक डॉं. ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ यांनी आपल्या मनोगतात सर्व सहभागी कलाकारांचे आभार मानले, विजेत्यांचे अभिनंदन केले आणि भविष्यातील सांस्कृतिक प्रवासासाठी सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कलाकारांनी सातत्याने सराव करून आपल्या कलेला योग्य व्यासपीठ मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
एकपात्री अभिनयाच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांना संधी देणारी ही स्पर्धा डोंबिवलीतील सांस्कृतिक चळवळीला चालना देणारी ठरली, अशी प्रतिक्रिया उपस्थित रसिक प्रेक्षकांनी व्यक्त केली.


Social Plugin