* उर्दू विभागातील विद्यार्थ्यांचे 40 हून अधिक प्रकल्प
नगरदेवळा / प्रतिनिधी :- सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील उर्दू विभागातर्फे विज्ञान व गणित विषयाचे शैक्षणिक साहित्य व प्रकल्प प्रदर्शन शनिवार, 29 नोव्हेंबर 2025 रोजी अत्यंत उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात पार पडले. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी 40 हून अधिक विज्ञान व गणित विषयांचे प्रकल्प व शैक्षणिक साहित्य सादर करून आपली गुणवत्ता दाखवून दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्राम शिक्षण समिती संचलित नगरदेवळा संस्थेचे मानद सचिव शिवनारायण जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे साहित्य आणि प्रकल्प बारकाईने पाहिले तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः दिलेली माहिती आवर्जून ऐकून घेतली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मानद सचिव शिवनारायण जाधव होते, तर संस्थेचे संचालक अब्दुल गनी सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक किरण काटकर, उपमुख्याध्यापक व्ही. बी. गहरवाल, संस्कृती विभाग प्रमुख संजीव बावस्कर, पर्यवेक्षिका मनिषा जाधव, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. उमेश काटकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हिरालाल सर तसेच समाधान ठाकूर, पी. आर. तायडे, जाकीर अली, अहतेशाम सर, जहागीर सर, वकार सर, आफरोज सर, मोहसीन सर, इरम मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
याशिवाय जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त उपक्रमशील शिक्षक शेख जावेद रहीम सर व वसीम मेंबर, तसेच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात मुख्याध्यापक किरण काटकर सर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले व विज्ञान - गणित विषयातूनच विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती व संशोधन वृत्ती विकसित होते, असे सांगत शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे अब्दुल गनी सेठ यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत शैक्षणिक उपक्रमात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल शेख सर यांनी केले, प्रास्ताविक सादिक शेख सर यांनी मांडले, तर आभार कलीम शेख सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी अब्दुल गनी सेठ, प्रा. उमेश काटकर सर आणि उर्दू विभागातील सर्व शिक्षकवृंद यांनी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणारा आणि ज्ञानात भर घालणारा हा शैक्षणिक साहित्य प्रदर्शन कार्यक्रम विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.


Social Plugin