Type Here to Get Search Results !

ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे डॉं. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदरांजली

* घणसोली, नवी मुंबई येथे 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रम

घणसोली, नवी मुंबई / प्रतिनिधी :- विश्वरत्न महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार, 6 डिसेंबर 2025 रोजी ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्था (नोंदणीकृत), घणसोली, नवी मुंबई यांच्या वतीने आदरांजली व पुष्पांजली वाहण्याचा भावपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, कै. अण्णासाहेब पाटील उद्यान, सेक्टर - 4, घणसोली येथे शांत व श्रद्धामय वातावरणात पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यानंतर डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करून ज्योती प्रज्वलन करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करीत आदरांजली वाहून अभिवादन केले. यानंतर डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना कोटी-कोटी प्रणाम करण्यात आला तसेच श्री बुद्ध वंदनेने कार्यक्रम अधिकच पावन करण्यात आला.


या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख उपस्थितीत उत्तम बनसोडे, प्रमोद गायकवाड, रमेश रणपिसे, दत्तात्रेय कुंजीर, प्रभाकर देशमुख, जाधव, सुनीता गायकवाड यांच्यासह अनेक सदस्य सहभागी झाले होते.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून समता, बंधुता, न्याय आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून भारतीय संविधानातील मूल्ये आत्मसात करण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


हा आदरांजली कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक जाणीवेचे आणि राष्ट्रीय विचारांशी असलेल्या निष्ठेचे प्रतीक ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement