* मिसेस क्लासिक युनिव्हर्स 2025 किताबाने भारताचा मान उंचावला
* 65 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत मराठमोळी झळाळी
नाशिक / फिरोज पिंजारी :- वय ही फक्त संख्या असते, स्वप्नांना मर्यादा नसतात आणि जिद्द असेल तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात नाव उजळता येते, याचा प्रेरणादायी आदर्श म्हणजे मालेगावची कन्या डॉं. रिया रवींद्र पलवणकर होय. मलेशियात नुकत्याच पार पडलेल्या ‘मिसेस क्लासिक युनिव्हर्स 2025’ या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत जागतिक विजेतेपदाचा मुकुट जिंकला. वयाच्या 65 व्या वर्षी मिळवलेले हे यश संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
* शेतकरी कुटुंबातून जागतिक मंचापर्यंत :- मालेगाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रिया पलवणकर यांनी जीवनात अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जन, 38 वर्षांचा शासकीय वैद्यकीय अनुभव, 13 मराठी चित्रपटांचे गीत लेखन, 6 मालिकांचे शीर्षक लेखन, 21 मालिकांमध्ये अभिनय, कला आणि विज्ञानाचा संगम जपणाऱ्या या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाने सौंदर्यवती स्पर्धेत दाखवलेली आत्मविश्वासपूर्ण कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
* मलेशियातील ‘मिसेस क्लासिक युनिव्हर्स’ :- 17 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान मलेशियात झालेल्या सुपर मॉडेल युनिव्हर्स स्पर्धेत जपान, रशिया, सिंगापूर, पोर्तुगाल, टोकियो अशा 21 देशांच्या स्पर्धकांमध्ये रिया पलवणकर यांनी विजयाची छाप उमटवली. 21 नोव्हेंबर रोजी हॉटेल कोकार्ड, मलेशिया येथे त्यांना मिसेस क्लासिक युनिव्हर्स 2025 हा प्रतिष्ठित मुकुट प्रदान करण्यात आला.
* मराठमोळे सादरीकरण - सभागृह मंत्रमुग्ध :- तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांनी स्वतःने लिहिलेल्या “कशी दिसते मी नऊवारी साडीत” या गाण्यावर पारंपारिक लावणी सादर करून संपूर्ण सभागृहाला मंत्रमुग्ध केले. नॅशनल कस्टम राऊंडमध्ये त्यांनी भारत मातेच्या वेशभूषेत, एका हातात भारतीय संविधान, दुसऱ्या हातात धान्य अशी झळाळती प्रस्तुती सादर केली. संविधानाच्या 75 वर्षांच्या स्मृतिनिमित्त हा अभिमानाचा क्षण ठरला.
* समाजसेवेची वेगळी ओळख :- दंतचिकित्सेतील त्यांच्या सेवेसाठी आऊटस्टँडिंग डेंटिस्ट ऑफ द इयर 2013, स्पेशल ज्यूरी अवॉर्ड 2025 असे सन्मान मिळाले आहेत. त्यांनी धावत्या शस्त्रक्रियेचा जागतिक विक्रम केला आहे.
* 'अत्त दीप भव’ - बुद्धांच्या विचारांनी प्रेरित जीवन :- डॉं. रिया पलवणकर यांचे ध्येय स्पष्ट आहे की, सर्वांसाठी न्याय्य व समान आरोग्यसेवा, महिलांना आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि प्रेरणा देण्याची भावना त्यांना या स्पर्धेत घेऊन आली.
* महाराष्ट्राचा अभिमान :- केबीएसएस ग्रुप ऑफ महाराष्ट्रातर्फे दिपक निकम, मनिषा देशमुख, जया शार्दुल, मनिषा धिवरे, पूजा गाडेकर, सोनाली राजगुरू, पूजा परदेशी यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. रिया पलवणकर यांनी सिद्ध केले की, आपण विश्वास ठेवला तर काहीही अशक्य नाही. त्यांचा अदम्य आत्मविश्वास, परिश्रम, प्रतिभा आणि सौदर्याचा तेज आज संपूर्ण भारताचा अभिमान आहे.


Social Plugin