* सुखसोयींनी परिपूर्ण, पर्यावरणपूरक प्रवासाची नवी सुविधा ; दर 693 रुपये, दिवसातून चार गाड्यांची व्यवस्था
जळगाव / प्रतिनिधी :- जळगावकरांसाठी नाशिकला जाणे आता अधिक आरामदायी आणि जलद झाले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (ST) जळगाव - नाशिक मार्गावर ई-शिवाई इलेक्ट्रिक वातानुकूलीत बससेवा सुरू केली असून प्रवाशांना अत्याधुनिक, प्रदूषणमुक्त आणि शांत प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.
* ई-शिवाईच्या ताफ्यात जळगाव विभागाचा वेगवान विस्तार :- राज्यात ई-शिवाई बसेसचा विस्तार वेगात होत असताना जळगाव विभागातही आतापर्यंत 42 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. 17 बस 9 मीटर, 25 बस 12 मीटर आहेत. जळगाव आगाराला 12 व चोपडा आगाराला 5 ई-शिवाई बसेस देण्यात आल्या आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 9 मीटर बस 200 किमी क्षमता, तर 12 मीटर बस 280 किमी पर्यंत धावते. त्यामुळे जळगाव, चोपडा आगारांमधून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अकोला, बीड, नंदुरबार, धुळे, शिरपूर, शिंदखेडा, अमळनेर आणि रावेर या मार्गांवरही सेवा सुरू आहे.
* जळगाव - नाशिक मार्गांवर दिवसातून चार बस :- नुकतीच सुरू करण्यात आलेली जळगाव - नाशिक ई-शिवाई सेवा प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे स्विकारली आहे. सद्यस्थितीत या मार्गांवर चार गाड्या धावत आहेत. दररोज जळगावहून सकाळी 6 वाजता विनाथांबा थेट नाशिक, सकाळी 9 वाजता, दुपारी 1.30 वाजता, सायंकाळी 4 वाजता बसेस सुटतील. एकूण तिकीट भाडे 693 रुपये आहे. पहाटेची विशेष बस कुठेही न थांबता थेट नाशिकला पोहोचत असल्याने प्रवाशांचा वेळ लक्षणीय प्रमाणात बचत होत आहे.
* जळगाव विभागात ‘ई-शिवाई फेज-2’ ची मोठी तयारी :- वाढती मागणी पाहता जळगाव विभागात ई-शिवाई प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या फेजमध्ये 99 नवी इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार असून 35 बसेस जळगाव आगारासाठी राखीव तर उर्वरित बसेस पाचोरा, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर आगारांत वाटप करण्यात येणार आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्रात ई-शिवाईचे जाळे आणखी मजबूत होणार आहे.
* पर्यावरणपूरक प्रवास - प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :- ई-शिवाई बसेस शांत, शून्य प्रदूषण, आरामदायी सीट्स, थंड वातानुकूलन आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखल्या जात असल्याने प्रवासी याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. जळगावहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना आता एक वेगवान, आरामदायी आणि सातत्यपूर्ण सेवा उपलब्ध झाल्याने ही योजना एसटी (ST) ची आधुनिक पुढची पायरी ठरत आहे.


Social Plugin