नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पुढाकाराने नगरदेवळा गावासह चुंचाळे, पिंपळगाव, बदरखे, निपाणे व नगरदेवळा सीम या परिसरातील गरजू, गरीब नागरिकांसाठी ब्लँकेट वाटपाचा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाच्या माध्यमातून थंडीच्या दिवसांत गरीब व निराधार व्यक्तींना दिलासा मिळावा, हाच मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
युवा नेत्या अभिलाषा रोकडे या नेहमीच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजासाठी कार्यरत असतात. महिला, युवक-युवती, खेळाडू, गरीब, गरजू, दलित व अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून “आपल्या हातून किमान एक तरी सत्कर्म घडावे” या भावनेतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला सिद्धार्थ पवार, दीपक पवार सर, नवल बागूल, सुनील कदम (चुंचाळे), राजूभाऊ गायकवाड (पिंपळगाव), भागवत बागूल, संजय करवंदे (नगरदेवळा सीम), शंकर सोनवणे (निपाणे), निंबा धिवरे सर (बदरखे), योगेश पाटील, अभिजीत रोकडे, योगेश पाटील, एजाज पिंजारी यांच्यासह महिला वर्ग, समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनाच्या पावन प्रसंगी सामाजिक एकात्मतेचा व माणुसकीचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला. गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव दिसून आले. डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतीत उतरवत समाजहितासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जात रहावेत, अशी भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली.


Social Plugin