मुंबई / रामदास धो. गमरे :- संबोधी प्रकाशन संस्थेच्या विद्यमाने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते संगमेश्वर तालुक्यातील कनकमुनी गावचे सुपुत्र अशोक दाजी जाधव गुरुजी यांचे "विचार डॉं. बाबासाहेबांचे मानवमुक्तीचे" या पुस्तकरूपी ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच जेष्ठ विचारवंत, सधम्म पत्रिकेचे संपादक प्रा. आनंद देवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परळ, मुंबई - 12 येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रा. आनंद देवडेकरांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली बेटकर-मोहिते, शिवानी सावंत-वानखेडे यांनी सुमधुर व लाघवी भाषाशैलीत केले तसेच कार्यक्रमास प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असणारे प्रा. सम्राट जाधव, प्रा. उत्तम भगत, कवी साहित्यिक राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे या तिन्ही वक्त्यांनी अशोक जाधव गुरुजी यांचे "विचार डॉं. बाबासाहेबांचे मानवमुक्तीचे" या पुस्तका संदर्भात विचार व्यक्त करताना हा ग्रंथ प्रत्येक मनुष्यमात्रास संग्रही करून ठेवण्यासारखा दस्तऐवज आहे. विशेषतः साहित्यिक, विचारवंतांना तर मदत करणारा आगळावेगळा ग्रंथ आहे, असे नमूद करीत त्यांनी अशोक जाधव यांचे अभिनंदन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. आनंद देवडेकर यांनी पुस्तकाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत, बाबासाहेबांच्या चळवळीचा आढावा घेत "विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीज्योती महात्मा फुले यांना गुरू मानले तरी बाबासाहेबांनी सत्यशोधक चळवळ किंवा सत्यशोधक समाज यांचे ते सभासद झाले नाही. तर स्वतःच्या मानवमुक्ती चळवळीतून आपले कार्य सुरू ठेवले व ती जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला व आपल्या बांधवांना अंधारातून प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी अनेक ग्रंथांचे वाचन, चिंतन, मनन केले परंतु त्यांचे मन बुद्ध विचारधारेकडेच वळले व शेवटी त्यांनी बुद्धधम्माचा मार्ग स्विकारला आणि आपल्या लाखों बांधवांना त्या मार्गांवर मार्गस्थ केले. बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक सभेत परिवर्तनाचे जे जे विचार मांडले त्याचे संकलन करून त्याला ग्रंथरूपात संपादन करण्याचे महान कार्य अशोक जाधव यांनी केले आहे, हे पुस्तक केवळ पुस्तक नसून एक दस्तऐवज स्वरूपातील प्रत्येक माणसाला दिशा देणारा मार्गदर्शक ग्रंथ आहे, असे नमूद केले. लेखकाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शेवटी सर्वांच्या प्रशंसाची पोचपावती स्विकारत लेखक अशोक जाधव यांनी "मी सूची दिली नाही परंतु घटनांच्या तारखा, ठिकाण आणि वेळ हे दिले आहे कारण लोकांनी त्याचे वाचन, पठण, चिंतन, मनन करून त्यातून शिकवण घेऊन पुढील वाटचाल करावी या उद्देशाने मी सूची देण्याचे टाळले आहे, असे नमूद केले तसेच सदर ग्रंथ संपादन कार्यात ज्या ज्या लोकांनी मला अमूल्य अशी मदत केली, योगदान दिले त्यांच्या मी कायम ऋणात राहील असे सांगून त्या सर्वांचे तसेच पाहुणे, वक्ते व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, प्रभाकर बेटकर, रघु खामकर, जेष्ठ पत्रकार गुणाजी काजीर्डेकर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कॅसेटकिंग कवी गायक भार्गवदास जाधव (नाईस्कर) आदी नामवंत मान्यवर उपस्थित होते. सरतेशेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Social Plugin