* खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी पो. नि. सचिन हिरे यांचे स्पष्ट प्रतिपादन
खोपोली / फिरोज पिंजारी :- चार भिंतींत अडकलेले बालपण आणि मोबाईलच्या स्क्रीनवर जगणारे आभासी खेळ ही आजच्या पिढीसाठी धोक्याची घंटा आहे. मोबाईल गेमच्या व्यसनामुळे मुले एकलकोंडी, चिडचिडी आणि तणावग्रस्त होत आहेत. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल, तर मैदानच मुलांची खरी लाइफलाइन ठरली पाहिजे, असा ठाम आणि वास्तववादी संदेश खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांनी दिला. ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या भव्य उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पाहुण्यांचे उत्साहपूर्ण स्वागत, विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, खेळाडूंची थरारक प्रात्यक्षिके, ध्वजारोहण, क्रीडा-ज्योत प्रज्वलन व मैदान पूजन अशा विविध उपक्रमांतून कार्यक्रमाची दिमाखदार आणि जोशपूर्ण सुरुवात झाली. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विद्यालय प्राथमिक व पूर्वप्राथमिक शाळा, बी. एल. पाटील तंत्रनिकेतन, के. एम. सी. कॉलेज, शिशुमंदिर आणि गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल या सर्व शाखांच्या एकत्रित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. मैदानावर विद्यार्थ्यांसह पालक आणि क्रीडाप्रेमींची मोठी उपस्थिती होती.
यावेळी मंचावर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल, पोलिस निरीक्षक सचिन हिरे, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, संचालक दिनेश गुरव, दिलीप पोरवाल, भास्कर लांडगे, विजय चुरी, प्राचार्य के. एम. गोरे, प्रशांत माने, वर्षा घारे, डॉं. गौरव तिवारी, मुख्याध्यापिका जान्सी आँगस्टीन, समिक्षा ढोके तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पो.नि. सचिन हिरे यांनी पालकांना उद्देशून स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले, शिक्षणाच्या शर्यतीत आपण नकळत पाल्यांना मैदानापासून दूर खेचतो आणि त्यांच्या हातात मोबाईल देतो. मोबाईल स्क्रीनवर मिळणारा विजय खरा नसतो ; पण त्यातून निर्माण होणारा ताण मात्र खूप खरा असतो. मुलांना मैदानावर पाठवणे, हेच त्यांच्या भविष्याकरिता सर्वात सुरक्षित आणि शहाणपणाचे भांडवल आहे. तसेच मंडळाने सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार, शिस्तबद्ध आणि परवडणारे शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी विशेष प्रशंसा केली.
उद्घाटन समारंभात बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहुल यांनी सांगितले, खेळ विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाला धार लावतो. संघभावना, शिस्त, आत्मविश्वास, खिलाडू वृत्ती आणि पराभव स्विकारण्याची ताकद ही गुणवैशिष्ट्ये फक्त मैदानावरच शिकता येतात. अशाच मैदानांतून भविष्याचे अधिकारी, नेते आणि सजग नागरिक तयार होतात. मंडळाने शिक्षण क्षेत्रात उभारलेली भक्कम व्यवस्था म्हणजे ‘शिक्षणाची पंढरी’ असल्याचे नमूद करीत त्यांनी अध्यक्ष संतोष जंगम व संचालक मंडळाचे मनापासून कौतुक केले.
क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक प्राचार्य के. एम. गोरे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय डॉं. गौरव तिवारी व अमित विचारे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉं. जयंत माने यांनी प्रभावीपणे केले.
मोबाईलच्या वाढत्या व्यसनावर भाष्य करीत मैदानाच्या महत्त्वाची ठाम जाणीव करून देणारा हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांसह पालकांसाठीही दिशादर्शक ठरला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


Social Plugin