* विद्यार्थ्यांकडून 12 व्या अध्यायाचे सामूहिक पठण, गुणगौरवाने वातावरण भारावले
जिंतूर / प्रतिनिधी :- श्री संचारेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या संस्कार केंद्रात भगवद्गीता जयंती अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवार, 1 डिसेंबर 2025 रोजी आयोजित या कार्यक्रमात अध्यात्म, संस्कार आणि भारतीय मूल्यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
* प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व गीता ग्रंथपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात :- या उत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रवीकुमार पेशकार (स्थानिक कार्यवाह) यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्यांमध्ये गीता परिवार सदस्य रेखा मणियार, उपाध्यक्ष सुनीता मंत्री, कोषाध्यक्ष रिता साबू तसेच शालेय समितीचे अध्यक्ष वसंतराव पुराणिक, उपाध्यक्ष उल्हास जिंतूरकर आणि सदस्य प्रसाद खेर्डेकर व मीरा खापरखुंटीकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन आणि श्रीमद्भगवद्गीतेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवद्गीता आरतीने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
* विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद पठण - 12 वा अध्याय तोंडपाठ :- कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण नाईक यांनी प्रभावीपणे केले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांकडून भगवद्गीतेच्या 12 व्या अध्यायाचे सामूहिक पठण भावपूर्ण वातावरणात झाले. विशेष म्हणजे ज्यांना 12 वा अध्याय पूर्णपणे तोंडपाठ होता अशा विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून त्यांना रजिस्टर भेट देण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे सानिका घुगे, वंशिका कोकडवार, मंजिरी वट्टमवार, शांभवी रामपुरकर, मयुरी सोमानी, दूर्वा लाटकर, नंदिनी कोद्रे, प्रार्थना पाटील, स्वरा ठोंबरे, आराध्या राठोड, अक्षरा कुरकुटे, रेवा देशपांडे व बालवाडी विभागाच्या विश्वजा नाईक, सानवी कौडगावकर, स्वरा सातपुते, मधुरा गाडेकर अशी आहेत.
* विद्यार्थ्यांना संस्कारमूल्यांचा संदेश :- प्रमुख पाहुण्या रेखा मणियार यांनी भगवद्गीतेचे महत्व सांगताना विद्यार्थ्यांना "कर्तव्यनिष्ठा, धैर्य आणि सत्य यांचा मार्ग स्विकारा" असा संदेश दिला. तसेच त्यांनी श्रीकृष्ण लीला व प्रेरक कथा सांगून विद्यार्थ्यांना अध्यात्मिक मूल्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उषा खराबे यांनी प्रभावीपणे केले, तर आभार विवेक मुक्कावार यांनी मानले.
संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांनी समन्वय साधून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गीता जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, ज्ञान आणि नैतिक मूल्यांचे बीज रुजविण्याचा प्रयत्न विद्यालयाकडून करण्यात आला.


Social Plugin