* 51 ज्येष्ठांचा वाढदिवस साजरा ; समाजसेवक, पत्रकार आणि मदतकर्त्यांचा सत्कार - आनंद, कृतज्ञता आणि सेवा यांचा सुंदर संगम
नवी मुंबई / प्रतिनिधी :- सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या परंपरेला उजाळा देत, महिन्याच्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात येणारा “आनंद मेळावा” 30 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात पार पडला. या विशेष मेळाव्यात 51 ज्येष्ठ सभासदांचे वाढदिवस पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देऊन साजरे करण्यात आले.
या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील अनुकरणीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होय. सौ. अलका भुजबळ (प्रसारमाध्यम क्षेत्रातील राष्ट्रीय रापा पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या), सौ. अश्विनी संदेश मोरे आणि लक्ष्मीकांत कोळपकर (संघाचे जेष्ठ सदस्य उत्तम चव्हाण यांच्या अपघातप्रसंगी तत्पर मदत करणारे), नारायण साखरे (संघाचे फलक सुंदर अक्षरलेखनातून सतत तयार करणारे सेवाव्रती सदस्य) यांचा माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, समाजसेवक अविनाश जाधव आणि प्रियंका जाधव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश एकावडे व शरद पाटील यांनी केले. भविष्यातील कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन नवनियुक्त अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी केले. वाढदिवस मानकऱ्यांची निवेदन वाचन उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी केले. देणगीदारांची नावे वाचन खजिनदार महादेव पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी मानले. ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते पत्की आणि इतर सदस्यांनी सामूहिक वाढदिवस गीत सादर करून वातावरणात आनंद अधिक रंगवला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व ज्येष्ठ नागरिकांना स्नॅक्सचे वाटप करण्यात आले. संघाचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्यामुळे मेळावा अधिक उत्साहवर्धक ठरला. ज्येष्ठांचा मान, त्यांच्या सेवेत आनंद सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचा हा उपक्रम समाजासाठी अनुकरणीय ठरत आहे.


Social Plugin