Type Here to Get Search Results !

महादुला मेन रोडवरील सर्व्हिस रोडवर गॅस शेगडी दुरुस्ती दुकानाला भीषण आग

* सिलेंडर लिकेजमुळे दुर्घटना ; व्यापाऱ्यांची धावपळ, अग्निशमन व पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

कोराडी - महादुला / प्रतिनिधी :-  नॅशनल हायवे क्रमांक 47 वरील महादुला मेन रोडच्या सर्व्हिस रोडवर असलेल्या प्रकाश शिंदे यांच्या गॅस शेगडी रिपेअरिंगच्या मोठ्या दुकानाला सायंकाळी सुमारे 7 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून, शेजारील सर्व व्यापारी प्रतिष्ठानांनी तात्काळ दुकाने बंद करून आपले मनुष्यबळ सुरक्षितस्थळी हलवले.

प्रत्यक्षदर्शींनी घटनेची माहिती तात्काळ कोराडी पोलिस ठाण्याला दिली. माहिती मिळताच ए. पी. आय. म्हात्रे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गांने वळवली, त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला.


दरम्यान, कोराडी पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता विलास मोटघरे तसेच महादुला नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या दोन बंब तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. आगीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात दुरुस्तीच्या साहित्याचे व दुकानातील मालमत्तेचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.


प्राथमिक तपासात गॅस सिलेंडरमधील लिकेजमुळे आग लागल्याचे पोलिस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. घटनास्थळी ए. पी. आय. म्हात्रे, ए. एस. आय. चंदेल, ए. एस. एस. मनोज अंधारे, तसेच पोलिस कर्मचारी प्रकाश जाधव, संजय जाधव, संजय वानखेडे आणि बबन वैद्य यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.


या घटनेनंतर नागरिकांनी गॅस सिलेंडर व दुरुस्ती दुकांनांबाबत अतिरिक्त सुरक्षितता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला, अशी भावना परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement