* प्रेयसी राणीचा गळा दाबून खून ; मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
* वाकड पोलिसांनी आरोपी अनिकेत कांबळेला अटक
पुणे / प्रतिनिधी :- विवाहबाह्य प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावाचा शेवट भयावह हत्याकांडात झाला आहे. राणी गायकवाड (वय 26) या विवाहित महिलेचा प्रियकर अनिकेत महादेव कांबळे (वय 33) याने गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार धाराशीव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. वाकड पोलिसांनी अनिकेतला अटक केली असून खून आणि पुरावा नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
* गायब राणीपासून सुरू झालेला तपास…तांत्रिक पुराव्याने आरोपी उघड :- 26 नोव्हेंबर रोजी राणी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वाकड पोलिसांत तक्रार केली. तांत्रिक विश्लेषणादरम्यान राणी सतत अनिकेतच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना आढळले. चौकशीदरम्यान सुरुवातीला अनिकेतने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक पुरावे व पोलिसांच्या दबावाने अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
* विवाहबाह्य संबंधांचा दबाव आणि खुनाचा रचलेला कट :- राणी आणि अनिकेत दोघेही विवाहित असून त्यांना मुले आहेत. राणी आपल्या पतीपासून विभक्त होऊन अनिकेतसोबत राहण्याचा आग्रह धरत होती. अनिकेत मात्र स्वतः विवाहित असल्याने या नात्याला पुढे न्यायला तयार नव्हता. तिच्या सततच्या तगाद्याला कंटाळून त्याने खुनाचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.
* अखेरच्या भेटीतून ते हत्येपर्यंत…काय घडलं ? :- 26 नोव्हेंबर रोजी अनिकेतने राणीला फिरायला चल म्हणत कारमध्ये बसवले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. 27 नोव्हेंबर रोजी पहाटे अनिकेतने “गावी घेऊन जातो” असा बहाणा करून कार धाराशीव जिल्ह्यातील ढोकी गावाजवळ नेली. कार थांबविल्यानंतर झोपेत असलेल्या राणीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर लोखंडी रॉडने वार करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.
* आरोपी अटकेत ; पुढील तपास सुरू :- तपासात मिळालेल्या तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स, लोकेशन आणि घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे अनिकेत महादेव कांबळे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर IPC कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की हा गुन्हा नियोजनबद्ध असून आणखीही काही पुरावे तपासले जात आहेत.


Social Plugin