* महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या भाषणांतून बाबासाहेबांच्या विचारांना उजाळा
जिंतूर / प्रतिनिधी :- महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर 2025 रोजी श्री संचारेश्वर विद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गायकवाड होते, तर विवेक मुक्कावार आणि जान्हवी आघाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि समाजसुधारणेतील कार्यावर प्रकाश टाकला. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने बाबासाहेबांचे विचार मांडल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते विवेक मुक्कावार आणि जान्हवी आघाव यांनी डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारधारेचे महत्त्व विशद केले. बाबासाहेबांचे विचार आजच्या काळात किती महत्त्वाचे आहेत, हे त्यांनी प्रभावीपणे पटवून दिले.
अध्यक्षीय समारोपात संजय गायकवाड यांनी आजच्या समाजाची सद्यस्थिती मांडत डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या समाजप्रबोधन कार्याचे मोलाचे योगदान सविस्तरपणे सांगितले. समाजात समतेचा विचार रुजवण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानंतर संस्कार केंद्राचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी शहरातील भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन केले.
याप्रसंगी अध्यक्ष महालिंग अप्पा कुरे, भाशिप्र केंद्रीय सदस्य रविकुमार पेशकार, तालुका कार्यवाह गणेश खवणे, माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष ललितजी देव यांच्यासह सर्व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करणारा आणि बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.


Social Plugin