Type Here to Get Search Results !

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पिंपरी-चिंचवडसाठी कोअर कमिटी बैठक संपन्न

* ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या पुढाकाराने महानगरपालिका निवडणूक तयारीला सुरुवात

पुणे / प्रतिनिधी :- राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या कोअर कमिटीची पहिली बैठक पुण्यात ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली.

या बैठकीत आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची धोरणात्मक दिशा, संघटनात्मक बांधणी तसेच उमेदवार निवडीसंदर्भातील प्राथमिक आराखडा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी मार्गदर्शन करताना आझमभाई पानसरे म्हणाले की, कोअर कमिटीच्या माध्यमातून निवडणूक नियोजनाची अधिकृत सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पक्ष संघटनेतील पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर संघटनेबाहेरील, पण शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या नागरिकांचे अर्ज स्विकारण्यात येतील.


इच्छुक उमेदवारांशी संवाद सुलभ करण्यासाठी विधानसभा निहाय दोन-दोन प्रतिनिधी तसेच शहर पातळीवर दोन प्रतिनिधी नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. इच्छुक उमेदवारांची माहिती संकलित झाल्यानंतर पुढील राजकीय रणनीती ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


पानसरे पुढे म्हणाले की, गेल्या पाच ते सात वर्षांत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भोंगळ आणि दिशाहीन कारभार सुरू आहे. हा कारभार बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. ज्यांनी हे शहर घडवले, त्या शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा शहरासाठी जोमाने काम करण्यास आम्ही सज्ज आहोत.


या बैठकीला कोअर कमिटीमधील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते. काही पदाधिकारी कामानिमित्त उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी आपल्या सूचना व कल्पना बैठकीपूर्वी पाठविल्याची माहिती देण्यात आली.


कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.


* विधानसभा निहाय निवडणूक अर्ज स्वीकृती प्रतिनिधी :-

शहर स्तर :

▪️ तुषार कामठे

▪️ देवेंद्र तायडे

भोसरी विधानसभा :

▪️ काशिनाथ जगताप

▪️ इम्रान शेख

पिंपरी विधानसभा :

▪️ सुलक्षणा शिलवंत

▪️ संदीप चव्हाण

चिंचवड विधानसभा :

▪️ सुनिल गव्हाणे

▪️ तुषार कामठे

वरील प्रतिनिधीकडे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आल्याची माहिती शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांनी दिली.


महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झालेली ही हालचाल पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवचैतन्य आणणारी ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement