Type Here to Get Search Results !

कोराडी विद्युत केंद्र व वसाहतीत बिबट्याचा मुक्त वावर आढळला

* सीसीटीव्हीत बिबट्या कैद ; कामगारांच्या सुरक्षिततेबाबत चिंता, सुरक्षा विभागाकडून सतर्कतेचे आवाहन

कोराडी (नागपूर) / प्रतिनिधी :- कोराडी विद्युत केंद्र परिसरात तसेच कोराडी विद्युत विहार कॉलनी आणि कामगार वसाहतीत वन्यप्राणी बिबट्याचा खुलेआम वावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कोराडी विद्युत केंद्राने उभारलेल्या उंच टॉवरवरील सीसीटीव्ही सर्व्हिलन्समध्ये बिबट्याचा वावर स्पष्टपणे कैद झाला असून, याबाबतची माहिती वरिष्ठ सुरक्षा अधिकारी देवेंद्रसिंग राठोड यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी पत्र क्रमांक 00836 द्वारे लोकहितार्थ प्रसिद्धीसाठी जारी केले आहे.

ही घटना कोराडी विद्युत विहार कॉलनी, 3 /660 मेगावॅट सीएचपी विभाग, डी.एम. प्लांट तसेच कामगार वसाहत असलेल्या रहिवासी क्षेत्रात घडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्युत केंद्रातील व परिसरातील कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


वन्यप्राणी जंगल परिसराबाहेर येऊन मानवी वस्तीमध्ये प्रवेश का करतात, हा एक गंभीर आणि संवेदनशील विषय असल्याचे मत व्यक्त होत आहे. अशातच नागपुरात येत्या काळात विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


विशेषतः वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या परिसरात गस्त वाढवावी व बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करावे, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोराडी विद्युत केंद्र व वसाहतीत राहणारे अनेक कामगार शिफ्ट ड्युटीवर काम करीत असल्याने रात्री - अपरात्री वावर असतो. अशा परिस्थितीत एखाद्या कामगारावर बिबट्याने हल्ला केल्यास जबाबदारी नेमकी कुणाची ? असा सवाल उपस्थित होत आहे.


या पार्श्वभूमीवर वरिष्ठ सुरक्षा अधिकारी देवेंद्रसिंग राठोड यांनी जनहितार्थ महत्त्वाचे सतर्कतेचे आणि काळजीचे निर्देश जारी केले आहेत.


अंधारात एकटे फिरणे टाळावे, शक्यतो 2-3 जणांच्या समूहानेच फिरावे, सोबत टॉर्च व काठी ठेवावी, समूहाने फिरताना शिटी वापरावी व मोबाईलचा आवाज मोठा ठेवावा, जेवणानंतर उरलेले अन्नपदार्थ उघड्यावर टाकू नयेत, सभोवतालचा परिसर झाडी-झुडपांपासून स्वच्छ ठेवावा, गरज नसताना रात्री अंधारात बाहेर जाणे टाळावे, वन्यप्राण्याला विनाकारण चिडवू नये, दगडधोंडे मारण्याचा प्रयत्न करू नये, लहान मुलांना बाहेर सोडू नये, उघड्यावर शौचास जाणे टाळावे, कोणताही हिंसक वन्यप्राणी दिसल्यास तत्काळ महानिर्मिती सुरक्षा विभागाशी आपत्कालीन क्रमांक 8411956583 / 841195860 / 7771152434 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोराडी विद्युत केंद्र परिसरात बिबट्याचा वावर ही घटना मानव - वन्यजीव संघर्षाची गंभीर सूचना मानली जात असून, तातडीने समन्वयात्मक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिक व कर्मचारी वर्गांतून व्यक्त होत आहे. सुरक्षा विभाग, वनविभाग आणि स्थानिक प्रशासन यांनी लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement