* सोलापूर येथे भव्य केडर कॅम्पचा समारोप ; ‘शूर सरदार’ सन्मानाने पदाधिकाऱ्यांचा गौरव
सोलापूर / अनिल पवार :- पत्रकारितेतील मूल्य, एकता आणि संघटनात्मक बळ यांना नवी ऊर्जा देणारा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य केडर कॅम्प सोलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कॅम्पच्या समारोपावेळी पंढरपूर अधिवेशन यशस्वी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा ‘शूर सरदार’ सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष डॉं. ओमप्रकाश शेटे, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि ज्येष्ठ मार्गदर्शक व विचारवंत आ. श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी पत्रकारिता, लोकशाही आणि समाजहित यावर सखोल विचारमंथन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करतांना डॉं. ओमप्रकाश शेटे म्हणाले, डॉक्टर जसा रुग्णाच्या शरीराची तपासणी करतो, तसे पत्रकार समाजाच्या विचारांची आणि लोकशाहीच्या नाडीची तपासणी करतो. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांना दिशा, संरक्षण आणि अभिमानाची नवी ओळख दिली आहे. सत्य, पारदर्शकता आणि लोकहित हीच पत्रकारितेची खरी ओळख असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, 'व्हॉईस ऑफ मीडिया’ ही केवळ संघटना नाही, तर पत्रकार घडविणारी आणि पत्रकारिता टिकवणारी चळवळ आहे. पत्रकारांची एकजूट असेल तर समाजातील अन्यायावर प्रहार करणे आणि लोकशाही मजबूत करणे शक्य आहे. पत्रकारांच्या कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि सुरक्षिततेसाठी संघटना करीत असलेल्या कामाचे त्यांनी खुलेआम कौतुक केले.
ज्येष्ठ आमदार व विचारवंत आ. श्रीकांत भारतीय यांनी संघटनात्मक कार्याची दिशा स्पष्ट करतांना संपर्क, बैठक, कार्यक्रम व निर्णय ही चार मूलतत्त्वे मांडली. ते म्हणाले, जसा कर्ण कवच-कुंडल्यांमुळे अजय झाला, तसाच श्रद्धा, समर्पण आणि चारित्र्य असल्यास कोणतीही संघटना अढळ राहते. अहंकार बाजूला ठेवून सामूहिक भावनेने काम करणे हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
या कार्यक्रमात संदीप काळे लिखित ‘जगातल्या पत्रकारितेला लागलेली घरघर’ (मराठी) व ‘The Hoarseness of Global Journalism’ (इंग्रजी) या दोन विचारप्रवर्तक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समारोपीय सत्रात संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकास, तत्त्वनिष्ठ कार्यपद्धती आणि पत्रकार एकतेच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार विचारवंत रवींद्र चिंचोलकर, संचालक व्यंकटेश जोशी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पंढरपूर, सोलापूर तसेच महाराष्ट्रभरातील पदाधिकाऱ्यांचा ‘शूर सरदार’ म्हणून सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कोर टीममधील दिव्या भोसले, स्नेहल पाटील, गोविंद जोशी व अक्षय श्रीकंठवार यांना विशेष गौरवण्यात आले. तसेच पंढरपूर व सोलापूर कोर टीममधील शिलेदारांसह मुख्य कोर टीम महाराष्ट्रातील गोरक्षनाथ मदने, अमोल मतकर, अजित कुंकूलोळ, कुमार कडलग, रश्मी मारवाडी, पल्लवी शेटे, संगम कोटलवार, नरेंद्र देशमुख, किशोर कारंजेकर, कल्पेश महाले, बापूसाहेब पाटील, वैशाली पाटील, चेतन कात्रे, आकाश अमृतवार, बाळासाहेब गडाख, गोरक्ष नेहे यांच्यासह स्वागत खपाले, माऊली डांगे, सुरज कौलगे, सुरज सरवदे, बालाजी फुगारे, तौफिक नदाफ, धनराज बगले, सचिन राठोड, सौरभ वाघमारे, दत्ता केरे, सादिक नदाफ, विजय पारसेकर, अमोल माने, संदीप बागल, तेजस गांजाळे, समाधान व्हनसाळे, गोपाळ माळी, गणेश गांडुळे, रोहिदास भोरकडे आदींचा गौरव करण्यात आला.
या केडर कॅम्प व सन्मान सोहळ्यामुळे पत्रकारांची संघटनात्मक ताकद, आत्मविश्वास आणि तत्त्वनिष्ठ पत्रकारितेची दिशा अधिक भक्कम झाली, अशी भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.


Social Plugin