* बँकिंग तज्ञ मधु शिरोडकर यांच्या सामाजिक जाणीवेतून साकारलेल्या पुस्तकाला अर्थतज्ञ विश्वास उटगी यांची प्रस्तावना
मुंबई / विश्वनाथ पंडित :- सहकार क्षेत्रातील सद्यस्थिती, आव्हाने आणि वास्तव यांचे सखोल विश्लेषण करणाऱ्या “सहकारी बँकांना झाले आहे तरी काय?” या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथे कौटुंबिक व सुसंस्कृत वातावरणात पार पडला. हे पुस्तक बँकिंग तज्ञ मधु सदाशिव शिरोडकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लिहिले असून अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन डीसीबी बँकेच्या वरिष्ठ अधिकारी पल्लवी बेळणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी बँकिंग, सहकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकाचे लेखक मधु शिरोडकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, बँक ऑफ इंडिया हीच माझ्या लेखन कौशल्याची खऱ्या अर्थाने शिल्पकार आहे. व्यावसायिक जीवनात मिळालेला अनुभव आणि कुटुंबाने दिलेले मानसिक स्वास्थ्य यामुळेच हे पुस्तक पूर्णत्वास नेता आले. या पुस्तकातून सहकारी बँकांच्या कार्यपद्धती, व्यवस्थापनातील त्रुटी, नियामक अडचणी तसेच भविष्यासाठी आवश्यक सुधारणांवर त्यांनी परखड भाष्य केल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी लेखकांनी हे पुस्तक आपल्या पत्नी कै. मनिषा शिरोडकर यांना समर्पित करीत भावनिक श्रद्धांजली अर्पण केली. हे पुस्तक केवळ आर्थिक क्षेत्रातील अभ्यासकांसाठीच नव्हे, तर सहकाराशी संबंधित नागरिक, संचालक व व्यवस्थापकांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर विचारप्रवर्तक दृष्टिकोन मांडणाऱ्या या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे सहकारी बँकिंग व्यवस्थेच्या पुनर्मूल्यांकनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Social Plugin