Type Here to Get Search Results !

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी, तर महाडसाठीही 1000 कोटी द्या - आनंदराज आंबेडकर

* चवदार तळे शताब्दी महोत्सवासाठी मोठ्या निधीची मागणी ; महाड-रायगड विकासाचा आराखडा मांडला

महाड / रामदास धो. गमरे :- महाड ही ज्ञानसूर्य विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रतापसूर्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक कार्याची साक्षीदार क्रांतीभूमी असून 2027 मध्ये येणाऱ्या चवदार तळे शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महाडसाठी एक हजार कोटी रुपयांचे विशेष अनुदान द्यावे, अशी ठाम मागणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केली.

* 55 कोटी अपुरे, महाडचा कायापालट होणार नाही :- शासनाने शताब्दी महोत्सवासाठी 55 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले असून मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजनही पार पडले आहे. मात्र, हा निधी अपुरा असून त्यातून महाडचा सर्वांगीण विकास शक्य नाही, असे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचे अनुदान दिले जाते, परंतु चवदार तळ्याचे शताब्दी वर्ष हे एकदाच येणारे ऐतिहासिक पर्व आहे. त्यामुळे या संधीचा उपयोग करून महाड आणि रायगड जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी किमान 1000 कोटींचे अनुदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


* विकासासाठी व्यापक आराखडा सुचविला :- या निधीतून रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक सुविधा, जीवनावश्यक सेवा, लघुउद्योग विकास तसेच डॉं. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्रांची स्थापना रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी करावी, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे सुशोभिकरण करून पर्यटनाला चालना देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.


* भिमसृष्टी योजनेत बौद्धजन पंचायत समितीचा सहभाग आवश्यक :- सन 1927 च्या महाड क्रांती संग्रामात तत्कालीन दलित सेवा संघ (आताची बौद्धजन पंचायत समिती) यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे भिमसृष्टी प्राधिकरण योजना राबवितांना बौद्धजन पंचायत समितीला विश्वासात घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.


* बौद्ध समाजासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची मागणी :- राज्यात विविध समाजघटकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळांप्रमाणे ‘बार्टी’सारख्या संस्थांवर बौद्ध समाजाच्या प्रतिनिधीची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच एसटी-एससी शिष्यवृत्ती संदर्भातील नव्या कायद्यामुळे बौद्ध तरुणांचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत तो कायदा तातडीने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली.


चवदार तळे शताब्दी महोत्सवानिमित्त बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या कार्यक्रमांमध्ये देश-विदेशातील भंते, भिक्षू, विचारवंत, साहित्यिक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.


* 99 वा महाड क्रांती संग्राम वर्धापन दिन उत्साहात साजरा :- या पार्श्वभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने 99 वा महाड क्रांती संग्राम वर्धापन दिन आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. महामानवांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमात मंगेश पवार आणि मनोहर मोरे यांनी धार्मिक विधी केले. सरचिटणीस राजेश घाडगे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले.


या कार्यक्रमास मनीषाताई आंबेडकर, ॲंड. अमन आंबेडकर, उपसभापती विनोद मोरे, किशोर मोरे, सुर्यवंशी, भूपेंद्र सवाटकर, रवींद्र शिंदे, एच. आर. पवार, लक्ष्मण भगत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपसभापती विनोद मोरे यांनी “भिमसृष्टी प्राधिकरण योजना राबवितांना आनंदराज आंबेडकर यांना योग्य स्थान दिले जावे, अशी मागणी आपल्या भाषणातून व्यक्त केली.


या प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे पदाधिकारी, महिला मंडळ, विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी तसेच कोकण विभागातील अनेक तालुक्यांतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement