Type Here to Get Search Results !

30 दिवसांत ठेकेदारावर होणार कारवाई ?

* खोपोलीत आम आदमी पार्टीचे आमरण उपोषण यशस्वी

* मलनिस्सारण योजनेतील विलंब व गैरव्यवहाराविरोधात आंदोलन, प्रशासनाने दिले लेखी आश्वासन

खोपोली / खलील सुर्वे :- मलनिस्सारण योजनेतील कामांच्या विलंबाबाबत चौकशी करून 30 दिवसांच्या आत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्याने खोपोली शहरातील मलनिस्सारण योजनेतील कथित गैरव्यवहार व कामातील विलंबाच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण अखेर यशस्वी ठरले आहे. महाराष्ट्र संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी प्रशासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेतले.

उपोषणादरम्यान खोपोली नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी संबंधित मलनिस्सारण योजनेतील कामांच्या विलंबाबाबत चौकशी करून 30 दिवसांच्या आत ठेकेदारावर आवश्यक दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले.


नगरपरिषदेने दिलेल्या आश्वासनानुसार पुढील उपाययोजना करण्यात येणार आहेत. कामाच्या गुणवत्तेची तांत्रिक तपासणी, विलंबाबाबत चौकशी समितीची नियुक्ती, दोषी आढळल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाई, संपूर्ण प्रक्रिया 30 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. 


प्रशासनाकडून ठोस हमी मिळाल्यानंतर डॉं. रियाज पठाण यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. या आंदोलनामुळे शहरातील मलनिस्सारण योजनेतील त्रुटींवर प्रशासनाला दखल घ्यावी लागली आहे.

महाराष्ट्र संघटन सचिव डॉं. रियाज पठाण. यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, नागरिकांच्या पैशातून सुरू असलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार किंवा हलगर्जीपणा अजिबात सहन केला जाणार नाही. प्रशासनाने दिलेले आश्वासन 30 दिवसांत पूर्ण झाले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल.

यावेळी खोपोली पोलिस ठाण्याचे अधिकारी सचिन हिरे, नगर परिषद अधिकारी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


* नागरिकांकडून आंदोलनाचे स्वागत :- या आंदोलनामुळे शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून मलनिस्सारण योजनेतील त्रुटींवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement