Type Here to Get Search Results !

17 व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉं. संदीप सांगळे यांची निवड

* मे 2026 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनासाठी मानाचा निर्णय ; साहित्य क्षेत्रात आनंदाची लहर

अहिल्यानगर / प्रतिनिधी :- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने मे 2026 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या 17 व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. डॉं. संदीप सांगळे यांची निवड करण्यात आली आहे. ही माहिती परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

अहिल्यानगर येथील जाधव लॉन्स येथे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या निर्णयामुळे साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


प्रा. डॉं. संदीप सांगळे हे सध्या साहेबराव ढमढेरे आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, तळेगाव ढमढेरे येथे कार्यरत असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांची एकूण 12 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये कथाकार शंकरराव खरात, मध्ययुगीन मराठी संत कविता : सामाजिक व वाड्मयीन मूल्यमापन, आधुनिक मराठी साहित्य : स्वरूप आकलन व आस्वाद, मराठी वाड्मय तंत्र : स्वरूप व आकलन, संत सोयराबाई : व्यक्तित्व व कर्तृत्व यांसह विविध संपादित ग्रंथांचा समावेश आहे.


* संशोधन व मार्गदर्शनात मोलाची कामगिरी :- डॉं. सांगळे यांचे 6 संशोधन निबंध राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 13 विद्यार्थ्यांनी पीएचडी, 12 विद्यार्थ्यांनी एम. फिल. पूर्ण केले आहेत.

त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, त्यामध्ये गुणवंत शिक्षक पुरस्कार, पद्मगंगा पुरस्कार, सकाळ एक्सलन्स अवॉर्ड, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार, डॉं. निर्मलकुमार फडकुले साहित्य पुरस्कार, पद्मश्री पु. ल. देशपांडे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार यांसह अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सन्मानांचा समावेश आहे.


* साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग :- डॉं. सांगळे हे महाराष्ट्र साहित्य परिषद, कर्जत शाखा तसेच ज्ञान प्रबोधिनी ग्रामविकास प्रतिष्ठान, पुणेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विविध साहित्यिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.


त्यांच्या निवडीबद्दल सुनील गोसावी, राजेंद्र उदागे, ज्ञानदेव पांडुळे, संपतदादा बारस्कर, डॉं. संजय कळमकर, मा. आ. लहू कानडे, भगवान राऊत आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement