* अवघ्या 3 वर्षांत क्रिकेटविश्वात घवघवीत यश!
* 25 हून अधिक ‘मॅन ऑफ द सिरीज’ किताब
* 1 कार, 3 बाईकसह अनेक पुरस्कार
भिवंडी / नरेंद्र एच. पाटील :- मैदानात उतरल्यावर प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांची झोप उडविणारा आणि आपल्या दमदार फलंदाजीने धावांचा पाऊस पाडणारा भिवंडी तालुक्यातील माणकोली गावचा सुपुत्र विनीत काळीराम माळी सध्या महाराष्ट्राच्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबईसह राज्यभरात आपल्या खेळाचा ठसा उमटवत विनीतने टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळाच इतिहास घडवला आहे.
अवघ्या 3 वर्षांच्या अल्प कालावधीत विनीत माळीने केलेली कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळाच्या जोरावर तो ठाणे जिल्ह्यातील असा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे, ज्याने इतक्या कमी वेळात तब्बल 25 हून अधिक ‘मॅन ऑफ द सिरीज’ किताब आपल्या नावावर केले आहेत.
त्याच्या यशाची साक्ष त्याने मिळविलेल्या पुरस्कारांवरूनच दिसून येते की, 1 आलिशान कार, 3 दुचाकी (बाईक), 3 सायकली, LCD टीव्ही, कूलर व विविध सन्मानचिन्हे मिळाले आहेत. ही यादीच त्याच्या खेळातील सातत्य आणि दमदार कामगिरीचे प्रतीक ठरते.
टेनिस क्रिकेटमध्ये विनीतने आतापर्यंत 20 हून अधिक अर्धशतके झळकावली आहेत. आक्रमक आणि संयमी फलंदाजीचा उत्कृष्ट मेळ त्याच्या खेळात दिसतो. मैदानाच्या कोणत्याही बाजूला तो सहज फटके मारतो आणि चेंडू सीमारेषेबाहेर पोहोचवतो, हीच त्याची खासियत ठरली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांमध्ये तो 'रनमशीन’ म्हणून ओळखला जातो.
माणकोलीसारख्या ग्रामीण भागातून येऊन विनीतने आपल्या जिद्दी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर क्रिकेटमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज तो राज्यभरात एक ‘मॅच विनर’ खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या या यशामुळे भिवंडी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विनीतच्या या यशामागे त्याचे वडील काळीराम गजानन माळी, भाऊ वैभव माळी, सचिन माळी, भावेश पवार, पावन केणे, जयेश पाटील, दीपु माळी, यशपाल माळी, वैभव सौरभ तसेच चवठा हिरवा, आई एकविरा क्रिकेट संघ माणकोली यांची मोलाची साथ आहे. नुकत्याच भिवंडी लाखिवली येथे पार पडलेल्या स्व. रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 (18 वे पर्व) स्पर्धेत विनीतच्या माणकोली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत विनीतला ‘मॅन ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आले आणि त्याला बाईक पुरस्कार म्हणून मिळाली ही त्याची तिसरी ‘मॅन ऑफ द सिरीज’ बाईक ठरली.


Post a Comment
0 Comments