Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत कर्मचारी बनले ‘स्वयंघोषित गावकारभारी’ ?

* उद्धट वागणूक, मनमानी कारभाराच्या तक्रारी ; ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत, पदाधिकाऱ्यांचे मौन कायम

कराड / विश्वास मोहिते :- सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी वर्गांकडून मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत असून हे कर्मचारी स्वतःला गावचे ‘कारभारी’ समजून वागत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. त्यांच्या उद्धट वर्तनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते. मात्र, संबंधित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे याकडे मौन असल्याने प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

* नियम धाब्यावर : ग्रामस्थांना तासन्‌तास प्रतीक्षा :- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे अपेक्षित असताना काही ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे, ग्रामस्थांशी नम्रतेने संवाद न साधणे, तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना तासन्‌तास थांबवणे अशा प्रकारच्या तक्रारी वाढत आहेत. मार्च महिना आर्थिक वर्षाचा शेवटचा असल्याने करवसुलीच्या नावाखाली कर्मचारी गावभर फिरत असल्याने कार्यालयीन कामे ठप्प होत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


* पदाधिकाऱ्यांचा कानाडोळा :- ग्रामस्थांनी या तक्रारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला असता, “मतांचे राजकारण आणि कर्मचाऱ्यांचा रोष टाळण्यासाठी” पदाधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्ष पाठींबा मिळत असून ग्रामस्थांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत.


* पंचायत समिती प्रशासनही निष्क्रिय ? :- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पंचायत समितीची असतानाही, “ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असल्याने कारवाई करता येत नाही” असे कारण देत अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.


* आम्ही काय करू ? ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया :- काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “कर्मचाऱ्यांची निवड पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणे कठीण जाते. पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याने आम्हीही मर्यादित आहोत.”


* कारवाई नेमकी कोण करणार ? :- पंचायत समिती कारवाई करू शकत नाही, पदाधिकारी दुर्लक्ष करतात आणि ग्रामसेवकही असहाय्य असल्याचे सांगतात, अशा परिस्थितीत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई नेमकी कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


* तिरंगा रक्षकांचा इशारा ; पाठपुरावा सुरूच राहणार :- या प्रकरणात ‘तिरंगा रक्षक’ संघटनेने आक्रमक भूमिका घेत, अशा कामचुकार आणि मनमानी करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात सातत्याने पाठपुरावा करण्याचा इशारा दिला आहे. गरज पडल्यास आंदोलनाचा मार्गही अवलंबला जाईल, असे संकेत देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement