* विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ ; नृत्य, नाट्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगली मैफल
खोपोली / दिनकर भुजबळ :- खोपोली येथील बी. एल. पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘कलाविष्कार 2025 - 26’ या सांस्कृतिक उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कला, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शशिकांत शेटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष अबुबकर ए. जळगावकर, सेक्रेटरी किशोर बी. पाटील, बी. एल. पाटील पॉलिटेक्निकचे चेअरमन जितेश एन. ठक्कर तसेच प्राचार्य प्रा. प्रशांत एस. माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी विजय चुरी, डॉं. रामहरी धोते, भास्कर लांडगे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘कलाविष्कार’ या उपक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलात्मक सादरीकरणांद्वारे आपले कौशल्य दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला रंगत आली. सादर केलेल्या कार्यक्रमांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
या प्रसंगी बोलताना संस्थेचे सेक्रेटरी किशोर बी. पाटील यांनी सांगितले की, संस्थेचा मुख्य उद्देश स्थानिक व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. आर्थिक, जागा आणि मनुष्यबळाच्या काही अडचणी असल्या तरी संस्थेचे पदाधिकारी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करीत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच संस्थेमार्फत सीबीएसई शाळा आणि लॉ कॉलेज सुरू करण्यात आले असून भविष्यात तांत्रिक शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान, प्रोजेक्ट आणि कौशल्य विकासाकडे लक्ष देत उद्योग क्षेत्राच्या गरजांनुसार स्वतःला तयार करावे, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना आपली कला व सर्जनशीलता सादर करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.


Social Plugin