Type Here to Get Search Results !

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांची सतर्कता

* आत्महत्येच्या प्रयत्नातील तरुणाचे प्राण वाचले

* इन्स्टाग्राम लाईव्हवर आत्महत्येची होती घोषणा

* पोलिसांच्या तातडीच्या कारवाईने दुर्घटना टळली

खोपोली / प्रतिनिधी :- मुंबई - पुणे द्रुतगती मार्गांवर आत्महत्या करण्याच्या उद्देशाने कारने निघालेल्या एका तरुणाचे प्राण पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत. बोरघाट पोलिस पथकाने वेळेवर कारवाई करीत संबंधित वाहन अडवून तरुणाला समजूत घालत आत्महत्येच्या प्रयत्नापासून परावृत्त केले. पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शनिवारी (15 मार्च) पहाटे सुमारे 3.05 वाजता खोपोली पोलिस ठाण्याच्या डायल 112 वर एक कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राने क्रेटा कार (क्रमांक MH-12/Y-4224) घेऊन इन्स्टाग्रामवर लाईव्ह व्हिडिओ करीत आत्महत्या करण्यासाठी निघाल्याची माहिती दिली. ही गंभीर माहिती मिळताच खोपोली पोलिसांनी तातडीने बोरघाट येथील पोलिस पथकाला सतर्क केले.


यानंतर बोरघाट येथील डी.डी. पथकातील पोलिस शिपाई सचिन घोरपडे यांनी त्वरित ही माहिती बोरघाट व्हॉट्स अँप ग्रुपवर प्रसारित केली. प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तरुण मुंबई - पुणे द्रुतगती मार्गांवरून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, बोरघाट पोलिस मदत केंद्रातील पोलिस हवालदार अमोल कांबळे, पोलिस शिपाई संदीप आव्हाड आणि पोलिस शिपाई नाशिर शेख यांनी सतर्कतेने महामार्गांवर दीड तास शोध घेतला. अखेर अमृतांजन ब्रिज परिसरात संशयित वाहन अडविण्यात पोलिसांना यश आले.


वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव संजय सुदाम दंडवते (वय 23, रा. वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) असे सांगितले. डायल 112 वरून मिळालेल्या माहितीशी तपासणी केल्यानंतर तोच तरुण असल्याची खात्री झाली. पोलिसांनी त्याच्याशी आपुलकीने संवाद साधत त्याला शांत केले आणि आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त केले.


यानंतर प्रभारी अधिकारी स्वप्निल पाटील यांच्या आदेशानुसार बोरघाट पोलिस मदत केंद्राच्या शासकीय वाहनातून त्या तरुणाला खोपोली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पुढे प्रभारी अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तरुणाला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. या घटनेची नोंद खोपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेत बोरघाट पोलिस पथकाने दाखविलेल्या सतर्कता, तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचले, त्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement