Type Here to Get Search Results !

तांबडी वसाहतीत स्वच्छता अभियान

* महिलांचा उत्स्फूर्त सहभाग : हुमाना पीपल टु पीपल व नीरामया प्रोजेक्टच्या पुढाकाराने उपक्रम ; आरोग्य व स्वच्छतेबाबत जनजागृती

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील तांबडी वसाहत परिसरात 16 मार्च 2026 रोजी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आला. हा उपक्रम हुमाना पीपल टु पीपल, नीरामया प्रोजेक्ट मुंबई आणि सहयोग मर्क स्पेशालिटी प्रा. ली. या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या स्वच्छता अभियानात स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. “आपले घर, आपला प्रभाग आणि आपली जबाबदारी” या भावनेतून येथील महिला व मुलांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. परिसरातील कचरा साफ करून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

या उपक्रमाचे स्थानिक नगरसेवक अमित फाळे यांनी कौतुक केले. तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष नाईक यांनीही या मोहिमेसाठी मोलाचे सहकार्य केले. खोपोली नगरपालिकेच्या आरोग्य विभागानेही या अभियानाला आवश्यक सहकार्य दिले. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विभाग प्रमुख व लीडर विठ्ठल ठाकरे, सरिता पेंडाम, रविना गायकवाड आणि ॲंड. प्रल्हाद बट्टेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.


दरम्यान, हुमाना पीपल टु पीपल ही संस्था गेल्या दीड वर्षांपासून खोपोली परिसरात सक्रियपणे कार्यरत आहे. संस्थेमार्फत शांतीनगर, क्रांतीनगर, प्रकाशनगर, यशवंतनगर, मिळगाव, शीळगाव, सुभाषनगर, सम्राट अशोकनगर आणि तांबडी वसाहत या झोपडपट्टी भागांमध्ये विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत आहेत.


संस्था संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती, तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी चर्चासत्रे आयोजित करीत आहे. याशिवाय महिलांसाठी आरोग्य शिबिरे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षिका आणि शासकीय नर्सेस यांच्यासाठी तज्ज्ञ डॉंक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व चर्चासत्रे आयोजित केली जातात. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरेही घेण्यात येतात.


महिला व मुलींसाठी आरोग्य गट स्थापन करणे, आरोग्य, स्वच्छता, पाणी व पर्यावरण विषयांवर जनजागृती करणे तसेच दरमहा किशोरी मुलींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप असे अनेक उपक्रम संस्था सातत्याने राबवत आहे. संस्थेच्या या सामाजिक कार्याचे खालापूर व खोपोली परिसरात सर्व स्तरांतून कौतुक होत असून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement