Type Here to Get Search Results !

ॲंड. प्रल्हाद बट्टेवार यांना ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर

* सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या कार्याचा गौरव ; 3 एप्रिल रोजी महाड येथे सन्मान

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते ॲंड. प्रल्हाद विश्वनाथ बट्टेवार यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला आहे. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांसाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव म्हणून हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

हा पुरस्कार शुक्रवार, 3 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता महाड तालुक्यातील न्यू सावित्री ब्रिजजवळील ‘फाउंटन इन (लिमोनेट लीला)’ येथे आयोजित ‘स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलन 2026’ कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभात अभिनेते अजय तपकिरे यांच्या हस्ते ॲंड. बट्टेवार यांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आई फाउंडेशन रायगड (भारत) आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


* सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात मोठे योगदान :- ॲंड. प्रल्हाद बट्टेवार हे सध्या एका खाजगी कंपनीत कार्यरत असून ते अखिल भारतीय मातंग संघ तसेच भारतीय बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणूनही कार्य करीत आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि कायदेविषयक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी एम.ए. (इतिहास), एम.ए. (राज्यशास्त्र), एल.एल.बी., एल.एल.एम. (मानवी हक्क), डि.एल.एल. अँड एल.डब्ल्यू. तसेच मुंबई विद्यापीठातून ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर विचार’ विषयातील पी.जी.डी. शिक्षण पूर्ण केले आहे.


* लहानपणापासून समाजकार्यात सक्रिय सहभाग :- ॲंड. बट्टेवार हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य मातंग समाज सेवा संघ आणि क्रांतीसम्राट स्व. डॉं. बाबासाहेब गोपले विचार मंच यांच्याशीही ते संलग्न आहेत. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या बट्टेवार यांनी 1985 साली अवघ्या 13 व्या वर्षी क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात सहभागी होत समाजकार्यात पहिले पाऊल टाकले.


* मातंग समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्न :- 1990 पासून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. 2003 पासून अखिल भारतीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष क्रांतीसम्राट डॉं. बाबासाहेब गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरुवात केली. संघटनेत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. 2003 खोपोली शहर सेक्रेटरी, 2005 रायगड जिल्हा उपाध्यक्ष, 2013 जिल्हा सेक्रेटरी, त्यांच्या कार्याची दखल घेत 2024 मध्ये क्रांतिज्योती कुसुमताई यांनी त्यांची रायगड जिल्हा व कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.


* आरक्षणासाठी आंदोलनांमध्ये सक्रिय भूमिका :- मातंग समाजाला 8 टक्के आरक्षण मिळावे या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलन, मंत्रालयावर मोर्चे तसेच नागपूर अधिवेशनावर काढलेल्या मोर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. समाजातील न्याय्य हक्कांसाठी ते सातत्याने लढत राहिले आहेत.


* अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात पुढाकार :- खोपोली शहरात मातंग समाजासाठी ‘अण्णाभाऊ साठे सभागृह’ उभारण्यासाठी त्यांनी 2005 पासून खोपोली नगरपालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे 2013 साली हे सभागृह उभारण्यात आले. या सभागृहाचे भूमिपूजन ते हस्तांतरण सोहळा क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले, नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर आणि आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते पार पडला.


* सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत सातत्यपूर्ण सहभाग :- 2006 पासून खोपोली शहरात अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली असून आजही हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. याशिवाय शिवजयंती, डॉं. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच विविध महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमांचे आयोजन ते सातत्याने करीत असतात.


सामाजिक कार्यासोबतच ते गरीब व गरजू नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन करणे, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या समस्या सोडविण्यास मदत करणे अशी सेवाही करीत असतात. तसेच सचिन अहिर प्रणित कामगार संघटनेचे कामगार प्रतिनिधी म्हणून काम करतांना अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.


* मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव :- ॲंड. प्रल्हाद बट्टेवार यांच्या या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत ‘डॉं. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार 2026’ जाहीर करण्यात आला असून त्यांच्या या यशाबद्दल सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement