* शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
* वन्य प्राणी व पक्षांना पिण्याच्या पाण्याची सोय
* 2 दिवसांत 12 हजार लिटर क्षमतेचा तलाव उभारला
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहराजवळील लव्हेज परिसरात वन्य प्राणी आणि पक्षांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून कृत्रिम पाणवठा (तलाव) उभारण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम वनपाल भगवान दळवी आणि तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
परिसरात वन्यजीवांना पिण्यासाठी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे ट्रस्टच्या सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेत वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन खात्याच्या सहकार्याने या पर्यावरणपूरक मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
* दोन दिवसांत उभारला मोठा कृत्रिम तलाव :- ट्रस्टचे महिला, पुरुष तसेच बाल मावळ्यांनी प्रचंड मेहनत घेत अवघ्या दोन दिवसांत मोठ्या आकाराचा कृत्रिम तलाव तयार केला. या तलावात सुमारे 10 ते 12 हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असून त्यामुळे परिसरातील वन्य प्राणी आणि पक्षांना उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमात परिसरातील जयेश मोरे, शैलेश फावडे आणि अंकुश फावडे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
* ट्रस्ट सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग :- या मोहिमेत ट्रस्टचे उपाध्यक्ष विशाल रामदास वाळुंज, सेक्रेटरी आशिष रामचंद्र खोपकर, खजिनदार किरण बुधा पाटील तसेच सदस्य राजेश पाटील, विशाल चव्हाण, ज्ञानेश्वर जगताप, राकेश रामचंद्र मिरवणकर आणि प्रदीप देशमुख यांनी सक्रिय सहभाग घेतला. महिला सदस्यांमध्ये सौ. सुवर्णा विशाल वाळुंज, सौ. नेहा ज्ञानेश्वर जगताप आणि सौ. ज्योती राकेश मिरवणकर यांनीही उत्साहाने योगदान दिले. याशिवाय साईदीप रितेश घावटे, भावार्थ किरण पाटील, साई ज्ञानेश्वर जगताप आणि गोलू देशमुख या लहानग्या मुलांनीही या उपक्रमात मेहनत घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
* वनव्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा उपक्रम :- काही दिवसांपूर्वी याच परिसरात वणवा लागून मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले होते. त्यामुळे उन्हाळ्यात वन्यजीवांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. अशा परिस्थितीत रणरणत्या उन्हात वन्यजीवांसाठी पाण्याची सोय करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे तालुका वनाधिकारी राजेंद्र पवार यांनी सांगितले.
समाजातील सामाजिक कार्यकर्ते वन विभागासोबत सक्रिय राहिल्यास भविष्यात पर्यावरणाचे संरक्षण आणि वन्यजीव संवर्धनासाठी मोठी मदत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून शिवतीर्थ श्रीरामनगर वेल्फेअर ट्रस्ट सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


Social Plugin