Type Here to Get Search Results !

‘जेष्ठ नागरिक संस्था, चौल’ची 25 वर्षांची गौरवशाली वाटचाल

* समाजकार्य, संस्कार आणि एकोप्याच्या बळावर उभारलेली भक्कम ओळख

चौल / ओमकार नागावकर :- स्व. डॉं. अच्युत महादेव ओक यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनातून गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर, 26 मार्च 2001 रोजी स्थापन झालेल्या ‘जेष्ठ नागरिक संस्था, चौल’ने आज 25 वर्षांची उल्लेखनीय व प्रेरणादायी वाटचाल पूर्ण केली आहे. अवघ्या 28 सभासदांपासून सुरू झालेली ही संस्था आज सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांमुळे एक भक्कम ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे.

* मुकुंद मनोहर यांच्या नेतृत्वाखाली भक्कम पायाभरणी :- संस्थेचे पहिले अध्यक्ष मुकुंद गजानन मनोहर यांच्या 14 वर्षांच्या कार्यकाळात सभासद संख्या 28 वरून तब्बल 87 पर्यंत वाढली. त्यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने शैक्षणिक साहित्य वाटप, महाड पुरग्रस्तांना मदत, सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे, मोफत वाचनालय आणि अल्प दरात वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देणे असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 2005 साली संस्थेला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा ‘उत्कृष्ट ग्रामीण संघ’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला.


* सांस्कृतिक परंपरा जपत सामाजिक कार्याचा विस्तार :- संस्थेने सामाजिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक परंपराही जपल्या. मासिक सभांमध्ये वाढदिवस साजरे करणे, पावसाळी व हिवाळी सहली, ज्येष्ठ नागरिक दिन, कोजागिरी, मकरसंक्रांत यांसारखे सण उत्साहात साजरे करण्यात आले. यामुळे चौल परिसरात संस्थेची वेगळी ओळख निर्माण झाली. या वाटचालीत वासुदेव व उषाताई वैद्य, सदानंद राऊत, श्रीकृष्ण लेले, सुरेश विद्वांस, दिनानाथ वर्तक, पुखराज चौधरी, मधुसूदन राईलकर, श्री व सौ. पटवर्धन, रामगीरी बुवा आदींचे मोलाचे योगदान लाभले.


* श्रीकृष्ण लेले यांच्या कार्यकाळात नवे परिमाण :- सन 2015 मध्ये श्रीकृष्ण वासुदेव लेले यांनी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर संस्थेच्या कार्याला नवे परिमाण प्राप्त झाले. 2015-16 मध्ये संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली. या काळात स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, एस. टी. पास शिबिर, कोयना पुरग्रस्तांना मदत, संजय गांधी निराधार योजना, अनाथ बालकांसाठी सहाय्य, संस्कार वर्ग तसेच कोरोना काळात ऑनलाईन सभा यांसारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. या काळात काही काळ रमेश म्हात्रे यांनीही अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.


* सतीश मनोहर यांच्या नेतृत्वाखाली नवचैतन्य :- 1 एप्रिल 2022 पासून सतीश दत्तात्रेय मनोहर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर संस्थेला नवचैतन्य लाभले. “President is one amongst equal” या विचाराने सर्वांना सोबत घेत त्यांनी संस्थेची सभासद संख्या पुन्हा 81 पर्यंत वाढवली. “सबका साथ, सबका आनंद” या ब्रीदवाक्यांतर्गत व्याख्याने, मुलाखती, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम तसेच विविध मान्यवरांचे मार्गदर्शन यांमुळे संस्थेची उपक्रमशीलता अधिक बळकट झाली.


* रौप्य महोत्सव सांगता सोहळा ठरणार संस्मरणीय :- 1 एप्रिल 2025 पासून सुरू झालेल्या रौप्य महोत्सव वर्षाची सांगता आता भव्य सोहळ्याने होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोकण विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष विलास काळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून रायगड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश बाबुराव पालकर आणि महासंघाचे सचिव दिपक करकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दुपारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली असू  त्यानंतर ठाणे येथील सुप्रसिद्ध गायक राहुल कुलकर्णी यांची संगीत मैफिल रंगणार आहे.


या भव्य सोहळ्याचे आयोजन सतीश दत्तात्रेय मनोहर (अध्यक्ष), देवानंद दत्तात्रेय पोवळे (सचिव), रोहिदास म्हात्रे (रौप्य महोत्सव समिती अध्यक्ष), विनोद जाधव (सचिव) आणि दिपक सखाराम तळेकर (उपाध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement