* जागतिक महिला दिनानिमित्त खोपोलीत भव्य शिबिर; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खोपोली / दिनकर भुजबळ :- तालुका विधी सेवा समिती, खालापूर आणि नागरी सामाजिक विकास संस्था, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले कायदेविषयक जनजागृती शिबिर खोपोली येथील लोहाणा समाज हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली.
* महिलांनी हक्कांसाठी सजग राहणे आवश्यक - न्यायाधीश एस. एस. देशमुख :- कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती एस. एस. देशमुख (अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खालापूर) यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
* कायदेविषयक जागरूकता ही काळाची गरज - डी. एस. खोते :- श्रीमती डी. एस. खोते (सह. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, खालापूर) यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट करीत समाजात कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे ही अत्यंत गरजेची बाब असल्याचे सांगितले.
या शिबिरात विविध कायदेविषयक विषयांवर सखोल माहिती देण्यात आली. ॲंड. आरती गुप्ता यांनी POCSO कायदा स्पष्ट करून अल्पवयीन मुलांच्या संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली. ॲंड. अनिता पवार यांनी मानव तस्करी या गंभीर विषयावर प्रकाश टाकत समाजाने सतर्क राहण्याचे आवाहन केले. ॲंड. एम. बी. सुरवकर यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण तसेच तालुका विधी सेवा समितीमार्फत उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर मदतीविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालनही केले.
* महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायद्यांचा प्रभावी वापर आवश्यक :- कार्यक्रमाच्या निमंत्रक व नागरी सामाजिक विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा वर्षा राजेश मोरे यांनी महिलांनी आपल्या हक्कांची सखोल जाणीव ठेवून कायद्यांचा योग्य वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले. बदलत्या सामाजिक परिस्थितीत महिलांचे वाढते योगदान अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. उपस्थित मान्यवर, वक्ते आणि सहभागींचे वर्षा मोरे यांनी आभार मानले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Social Plugin