Type Here to Get Search Results !

भुसावळ विभागातील 4 तिकीट तपासनीस ‘करोडपती’

* महसूल संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी : तिकीट तपासणीतून प्रत्येकी 1 कोटींहून अधिक उत्पन्न ; मध्य रेल्वेचा अभिमानास्पद विक्रम

भुसावळ / प्रतिनिधी :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महसूल संरक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत वित्त वर्ष 2025 - 26 मध्ये चार तिकीट तपासनीसांनी तिकीट तपासणीद्वारे ₹1 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवून ‘करोडपती’ होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या दक्ष, सातत्यपूर्ण आणि प्रामाणिक कामगिरीमुळे रेल्वेच्या महसुलात मोठी भर पडली आहे.

* 'करोडपती’ ठरलेले कर्मचारी कोण ? :- भुसावळ विभागातील तिकीट तपासनीसांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. त्यात निसार खान (टीटीआय, भुसावळ) - ₹1.47 कोटी, एस. के. गुप्ता (सीटीआय, भुसावळ) - ₹1.16 कोटी, के. के. पटेल (टीटीआय, भुसावळ) - ₹1.02 कोटी, डी. एन. चौधरी (सीटीआय, भुसावळ) -  ₹1.00 कोटी यांचा समावेश आहे. या सर्वांनी तिकीट तपासणीद्वारे प्रवाशांकडून दंड वसूल करीत रेल्वेच्या उत्पन्नाचे संरक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.


* महसूल वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान :- या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीमुळे विनातिकिट प्रवासावर नियंत्रण ठेवण्यात मोठे यश मिळाले असून रेल्वेच्या महसुलाचे होणारे नुकसान टळले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे तिकीट तपासणी विभागाची कार्यक्षमता आणि प्रतिष्ठा अधिक बळकट झाली आहे.


* आणखी कर्मचारी ‘करोडपती’च्या उंबरठ्यावर :- विशेष म्हणजे, ही यशस्वी कामगिरी केवळ चार कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून, आणखी पाच तिकीट तपासनीस ₹1 कोटींच्या उंबरठ्यावर असून, लवकरच तेही या यादीत सामील होण्याची शक्यता आहे.


* प्रवाशांना रेल्वेचे आवाहन :- मध्य रेल्वेकडून प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात आले आहे की, अधिकृत बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा IRCTC संकेतस्थळाद्वारे वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा. ‘Rail One’ ॲपद्वारेही तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.


* 'शून्य-सहिष्णुता’ धोरण कायम :- विनातिकिट प्रवासाविरोधात रेल्वेचे ‘शून्य-सहिष्णुता’ धोरण कायम असून प्रवाशांना सुरक्षित, सन्मानजनक व नियमबद्ध प्रवास अनुभव मिळावा यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील या चार कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक कामगिरीद्वारे एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement