Type Here to Get Search Results !

अमावस्येच्या रात्री ‘दरबार’

* भोंदू अशोक खरातच्या ‘व्हिजिट फी’चे धक्कादायक खुलासे

* SIT चौकशीत उघडकीस आली कोट्यवधींची माया

* एका भेटीसाठी तब्बल 5 लाखांची आकारणी, बँक खाती सील

नाशिक / प्रतिनिधी :- नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत आता त्याच्या ‘व्हिजिट फी’ आणि आर्थिक व्यवहारांबाबत मोठी माहिती समोर आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी खरातच्या कार्यालयाबाहेर पहाटेपासून आलिशान गाड्यांच्या रांगा लागत असल्याचा खुलासा झाला असून एका भेटीसाठी तो लाखो रुपये आकारत असल्याचे उघड झाले आहे.

स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून खरातच्या कार्यालयात ‘दरबार’ भरत असे. या दिवशी पहाटेपासूनच महागड्या आणि आलिशान गाड्यांची रांग लागत असे. जो भक्त जास्त पैसे देईल, त्यालाच प्राधान्य दिले जात असे. काही वेळा बाहेर जाण्यासाठी ‘व्हिजिट’ असल्यास हा दरबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचेही समोर आले आहे.


SIT तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, खरात नाशिकबाहेरील ‘आउटडोअर व्हिजिट’साठी तब्बल 5 लाखांपर्यंत फी घेत असे. ही भेट साधारण दीड ते दोन तासांची असायची. याशिवाय, प्रवासाचे अंतर वाढेल तसे त्याची फीही लाखोंनी वाढवली जात होती. काही प्रकरणांमध्ये भक्तांना विमानाने प्रवास करण्यासाठीही तो आग्रह करत असल्याचे समोर आले आहे.


खरात हा केवळ महागड्या कारमधूनच प्रवास करीत असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका पुण्यातील श्रीमंत भक्ताकडून पूजा करण्यासाठी वाहन हवे असल्याचे सांगत तब्बल 90 लाखांची कार खरेदी करून घेतल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. यानंतर ती कार स्वतःच्या नावावर करून घेतल्याची माहिती SIT चौकशीत पुढे आली आहे. फसवणूक झालेल्या सहा ते सात नागरिकांनी SIT कडे दिलेल्या जबाबात या सर्व प्रकारांची पुष्टी केली आहे. यानंतर तपास यंत्रणांनी खरातच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रीत केले आहे.


दरम्यान, खरातच्या ‘शिवानिका’ संस्थांची बँक खाती सील करण्यात आली असून त्याच्या मालमत्तेचा सखोल तपास सुरू आहे. कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घरे आणि दुकाने यांची माहिती गोळा केली जात आहे. नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू असून कोट्यवधी रुपयांची माया उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बेनामी मालमत्तेचाही संशय तपासात पुढे आला आहे.


SIT कडून तपासाला वेग देण्यात आला असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे समाजात खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणुकीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement