Type Here to Get Search Results !

पत्रकाराला धमकी व सोशल मीडियावर बदनामी

* पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल

* जळगांव पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार 

* नगरदेवळ्यातील घटनेनंतर आरोपीवर कारवाईची मागणी

* 7 दिवसांत गुन्हा नोंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथे एका पत्रकाराला शिवीगाळ, मारहाणीची धमकी देणे तसेच सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पाचोरा पोलिस स्टेशन येथे अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच आज मंगळवार, 31 मार्च रोजी साप्ताहीक वृत्त प्रभात व एनी टाईम न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक फारूख शाह नोमाणी तसेच नगरदेवळा येथील पत्रकार जावेद शाह यांनी जळगांव पोलिस अधीक्षक डॉं. माहेश्वरी रेड्डी यांची भेट घेवून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. 

तक्रारीनुसार, 29 मार्च 2026 रोजी “वृत्त प्रभात नगरदेवळा” या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर नगरदेवळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद परदेशी यांनी मोबाईल क्रमांकावरून संदेश व ऑडिओ क्लिप प्रसारित करून पत्रकारांविषयी बदनामीकारक वक्तव्य केले. या संदेशामुळे संबंधित पत्रकारांची समाजात प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


* दुकानात येऊन शिवीगाळ, मारहाणीची धमकी :- या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी ग्रुप अ‍ॅडमिन व पत्रकार जावेद शाह यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता विनोद परदेशी यांनी थेट नगरदेवळा येथील अशोक मेडिकल अँड जनरल स्टोअर्स येथे येऊन शिवीगाळ केली व मारहाणीचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. घटनेवेळी उपस्थित नागरिकांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर पोलिस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. पोलिसांच्या समजुतीनंतरही संबंधित व्यक्ती पुन्हा घटनास्थळी येऊन दमदाटी करीत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


* सोशल मीडियाचा गैरवापर, पत्रकारांची बदनामी :- कोणतीही खातरजमा न करता सोशल मीडियावर खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून पत्रकारांवर आरोप करण्यात आल्याने समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हा प्रकार पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


* कायदेशीर कारवाईची मागणी :- तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 356 (मानहानी), कलम 351 (गुन्हेगारी धमकी) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत कलम 66 व 67 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


* 7 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, या प्रकरणात 7 दिवसांच्या आत संबंधितांवर गुन्हा दाखल न झाल्यास पत्रकार जावेद शाह यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी पाचोरा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करतील. तसेच राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, जिल्हाधिकारी तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडेही करण्यात आली आहे. या प्रकरणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (NJA) व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांनी या प्रकरणात गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement