जळगाव / फिरोज पिंजारी :- शिक्षण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या वृंदावली महेश (शितल) सोमवंशी यांना प्रतिष्ठित ‘लोकमत वुमन अचीव्हर्स अवॉर्ड 2026’ ने आज, 31 मार्च 2026 रोजी जळगाव शहरातील एमआयडीसी पोलिस स्थानकाजवळील हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे सन्मानित करण्यात आले.
लोकमत समूहाच्या वतीने आयोजित या गौरव सोहळ्यात खान्देशातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला असून त्यामध्ये सोमवंशी यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
राजकीय व सामाजिकदृष्ट्या सक्रिय कुटुंबातून आलेल्या सोमवंशी यांनी शिक्षणाला प्राधान्य देत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. D.Ed. (डिएड) आणि B.Ed. (बीएड) शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपली भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या कुटुंबीयांचा मजबूत पाठिंबा आणि सामाजिक जाणीव यामुळे त्यांनी केवळ शिक्षणातच नव्हे तर समाजकारणातही प्रभावी कामगिरी केली. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करतांना त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले. निबंध स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलन यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना दिली. विद्यार्थ्यांमध्ये केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व नव्या युगातील संधींची ओळख करून देत त्यांनी शिक्षणाला नवे आयाम दिले. शैक्षणिक कार्याबरोबरच सोमवंशी यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी समाजात एकात्मता, परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला आहे, त्याच्या या कार्याची दखल घेत लोकमत समूहाच्या वतीने ‘लोकमत वुमन अचीव्हर्स अवॉर्ड 2026’ ने त्यांना सन्मानित करण्यात आले.
लोकमत समूहाने आयोजित केलेल्या या पुरस्कार सोहळ्यात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये सोमवंशी यांची निवड ही त्यांच्या बहुआयामी कार्याची पावती मानली जात आहे. हा सन्मान त्यांच्या शिक्षण, समाजकारण आणि संस्कृती क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल असून त्यांच्या कार्याचा प्रभाव राज्यस्तरावर अधोरेखित झाला आहे.
वृंदावली महेश (शितल) सोमवंशी यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments