Type Here to Get Search Results !

हिप्परगा थडीच्या अनुराधा आमेटवार यांची नांदेड पोलिस दलात निवड

* जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची यशस्वी कहाणी!

* अल्पभूधारक शेतकऱ्याची कन्या ठरली गावातील पहिली महिला पोलिस

* नांदेडसह राज्यभरातील कुंभार समाजासाठी अभिमानाची बाब

नांदेड / जावेद अहमद :- राज्यात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जिद्द आणि मेहनत पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. हिप्परगा थडी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील अनुराधा आबन्ना आमेटवार यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर नांदेड पोलिस दलात आपले स्थान निश्चित केले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण गावासह कुंभार समाजात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

* जिद्दीने गाठले यशाचे शिखर :- अनुराधा या आबन्ना शिवना आमेटवार यांच्या कन्या असून साध्या शेतकरी कुटुंबातून त्यांनी मोठे स्वप्न साकार केले आहे. कुटुंबात आई-वडील, एक भाऊ आणि त्या एकुलती एक मुलगी असा छोटा परिवार आहे. मर्यादित आर्थिक परिस्थितीतही त्यांनी हार न मानता सातत्याने अभ्यास आणि सराव सुरू ठेवला.


* शिक्षणातही उज्ज्वल कामगिरी :- त्यांचे प्राथमिक शिक्षण हिप्परगा थडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे सगरोळी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये त्यांनी इयत्ता 6 वी ते 13 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावी 74.60 % गुण व बारावी 77.54 % गुण मिळवले. यानंतर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करीत 76.03 % गुणांसह प्रथम श्रेणी मिळवली.


* पोलिस भरतीसाठी कठोर तयारी :- देशसेवेची भावना मनात ठेवून त्यांनी पोलिस भरतीची तयारी सुरू केली. नांदेड येथे राहून त्यांनी मराठी विषयासाठी संभाजी कदम सर आणि गणितासाठी सचिन गोमाशे सर यांचे मार्गदर्शन घेतले. फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या शारीरिक चाचणीत आणि 15 मार्च 2026 रोजी झालेल्या लेखी परीक्षेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत यश मिळवले.


* गावासाठी अभिमानाचा क्षण :- अनुराधा आमेटवार या हिप्परगा थडी गावातील तसेच कुंभार समाजातील आणि महिला प्रवर्गातील पहिल्या सरकारी नोकरी मिळविणाऱ्या युवती ठरल्या आहेत. त्यांच्या यशामुळे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे.

त्यांच्या या यशाबद्दल गावातील नागरिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. पप्पू महाराज, कौठकर सर, गजानन आरसेवार आदींनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अनुराधा या 'दैनिक अधिकारनामा' या वृत्तपत्राच्या बिलोली प्रतिनिधी राजेश आमेटवार यांच्या भगिनी असून त्यांच्या यशामुळे कुटुंबाचा मान उंचावला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement