Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यात ‘अल खिदमत फाउंडेशन’ची प्रेरणादायी वाटचाल

* इफ्तार ते इत्तेकाफ सेवा, राशन किट वाटप ते इमामांचा सन्मान ; सेवाभावातून एकात्मतेचा संदेश

* सामूहिक विवाह सोहळ्याने सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा येथे ‘अल खिदमत फाउंडेशन’च्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी सेवा, त्याग आणि एकात्मतेचा आदर्श निर्माण केला आहे. रोजेदारांसाठी इफ्तार व्यवस्था, इत्तेकाफ करणाऱ्यांसाठी भोजन सेवा, गरजू कुटुंबांना मदत आणि धार्मिक सेवकांचा सन्मान अशा बहुआयामी उपक्रमांमधून समाजात बंधुभावाचा प्रभावी संदेश दिला गेला.

* रोजेदारांसाठी इफ्तार, सेवाभावाची साखळी :- रमजान महिन्यात दररोज संध्याकाळी रोजा सोडण्यासाठी आवश्यक असलेले खजूर, फळे, पाणी, शरबत व इतर खाद्यपदार्थांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू रोजेदारांना मोठा दिलासा मिळाला. सेवा आणि सहकार्याची भावना अधिक दृढ झाली.


* इत्तेकाफसाठी विशेष टिफिन सेवा :- रमजानच्या शेवटच्या दहा दिवसांत इत्तेकाफ करणाऱ्या भाविकांसाठी नगरदेवळ्यातील जामा, मदीना, गरीब नवाज, मनियार आणि नूरानी मस्जिदींमध्ये टिफिन सेवा उपलब्ध करून देण्यात आली. इबादतीत मग्न असलेल्या भाविकांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरली.


* गरजूंसाठी राशन व शिरखुर्मा किट :- समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना लक्षात घेऊन राशन किट व शिरखुर्मा किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना ईद सण आनंदात साजरा करता आला.


* तरावीह नमाज व कुरआन तिलावत :- नगरदेवळ्यातील विविध मस्जिदींमध्ये रमजान महिन्यात दररोज रात्री तरावीह नमाज अदा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कुरआन शरीफचे तिलावत करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होत धार्मिक वातावरण अधिक बळकट केले.


* इमाम व धार्मिक सेवकांचा गौरव :- रमजान महिन्यात सातत्याने सेवा देणाऱ्या इमाम, मौलाना, हाफिज, काजी व मौजन यांचा ‘अल खिदमत फाउंडेशन’च्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या योगदानामुळे समाजात श्रद्धा, शिस्त आणि आध्यात्मिक वातावरण टिकून राहते, असे यावेळी नमूद करण्यात आले.

या सर्व उपक्रमांसाठी सुफियान शेख, फरीद खान, सईद मिस्त्री, अनीस बागवान, सैय्यद दानिश आणि अबरार खान यांनी पुढाकार घेतला. तरुण कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त झाले.


* सामूहिक विवाह सोहळा :- ‘अल खिदमत फाउंडेशन’ची सामाजिक बांधिलकी कायम राहिली आहे. नगरदेवळा येथे प्रथमच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम शादी हॉल, आजाद नगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात 5 जोडप्यांचा विधीवत विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आमदार किशोर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, अबुलेस हाजी अलाउद्दीन शेख, सरपंच प्रतिक्षा किरण काटकर, हाजी जाकिर अ. लतीफ, सैय्यद अयाज, अली नीयाज अली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


* सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा आदर्श :- अल खिदमत फाउंडेशनच्या या सर्व उपक्रमांमुळे नगरदेवळा परिसरात सामाजिक सलोखा अधिक दृढ झाला आहे. धर्म, सेवा आणि समाजकारण यांचा समतोल साधत फाउंडेशनने एक आदर्श निर्माण केला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement