* खोपोलीत गॅससाठी प्रचंड झुंबड
* टोकन प्रणालीची मागणी जोर धरतेय
* OTP अडचणी, घरपोच सेवा ठप्प
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ सुरू असून गॅस एजन्सीबाहेर भर उन्हात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लक्ष्मी नगरजवळील खोपोली एचपी गॅस एजन्सीसमोर गुरुवारी सकाळी 6 वाजल्यापासूनच ग्राहकांची गर्दी उसळली होती. अंदाजे 500 मीटरपर्यंत रांगा लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
* सिलेंडरसाठी तासन्तास प्रतीक्षा :- गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना 5 ते 7 तास रांगेत उभे रहावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांना दोन-दोन दिवस रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार आहे. “रांग लावणाऱ्यांना टोकन पद्धतीने सिलेंडर द्यावा,” अशी मागणी नागरिकांकडून जोरदारपणे केली जात आहे.
* कोटा कमी, वितरण व्यवस्थेवर ताण :- खोपोली गॅस एजन्सीचे मालक साखरे यांनी सांगितले की, एजन्सीला मिळणारा गॅस सिलेंडरचा कोटा कमी झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाली असून वितरण व्यवस्थेवर प्रचंड ताण पडत आहे.
* आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे स्थानिक परिणाम ? :- अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. त्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून गॅस सिलेंडरची उपलब्धता कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी भीतीपोटी अनेक नागरिक अतिरिक्त सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
* ऑनलाईन बुकिंग ठप्प, OTP अडचणी वाढल्या :- ऑनलाईन बुकिंग करताना ओटीपी (OTP) न मिळणे, घरपोच सेवा विस्कळीत होणे यामुळे ग्राहकांना थेट एजन्सी गाठावी लागत आहे. गॅस उपलब्ध असूनही वितरणातील अडचणींमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
* मूलभूत सुविधांचा अभाव :- रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. भर उन्हात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
* प्रवासाचा अतिरिक्त भुर्दंड :- गॅस सिलेंडरसाठी एजन्सीपर्यंत ये-जा करण्यासाठी नागरिकांना रिक्षाचे 50 ते 100 रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भारही वाढत असल्याची तक्रार होत आहे. गॅस एजन्सीकडे दररोज किती सिलेंडरचा कोटा मिळतो ? गोडाऊनमध्ये किती स्टॉक आहे ? तसेच संध्याकाळी सिलेंडर कुठे पाठवले जातात ? याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, खालापूर तहसिलदार व पुरवठा अधिकारी यांची दखल घेत नागरिकांना दिलासा देणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गॅससारख्या जीवनावश्यक वस्तूसाठी नागरिकांना अशा प्रकारे त्रास सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुरळीत वितरण व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


Social Plugin