Type Here to Get Search Results !

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, राज्य प्रशासनात मोठे फेरबदल

* विधिमंडळ अधिवेशनानंतर 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

* अश्विनी भिडे मुंबई महापालिका आयुक्तपदी, लोकेश चंद्र मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई / प्रतिनिधी :- राज्य विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 31 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या असून प्रशासनात महत्त्वपूर्ण हालचाली पाहायला मिळत आहेत.

* तुकाराम मुंढे यांच्याकडे नवी जबाबदारी :- दिव्यांग कल्याण विभागात धडाडीने काम करीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांवर कारवाई करणारे सचिव तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. आता त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंढे यांनी दिव्यांग विभागात काम करतांना अनेक बोगस प्रकरणे उघडकीस आणत शेकडो कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यांची ही कारवाई सुरू असतानाच झालेल्या बदलीमुळे प्रशासनात चर्चांना उधाण आले आहे.


* अश्विनी भिडे मुंबई महापालिका आयुक्त :- मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


राज्य सरकारने विविध विभागांमध्येही मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले आहेत. विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) म्हणून नियुक्ती, विनिता वैद्य सिंघल यांची मृद व जलसंधारण विभागात प्रधान सचिव म्हणून बदली, परिमल सिंह यांची सचिव (कृषी) पदावर नियुक्ती, माणिक गुरसळ यांची सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, लहू माळी यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, प्रेरणा देशभ्रतार यांची आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, पृथ्वीराज बी. पी. यांची आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका.


* प्रशासनात हालचालींना वेग :- या बदल्यांमुळे राज्य प्रशासनात नव्या धोरणात्मक हालचालींना वेग येणार असल्याचे मानले जात आहे. विशेषतः आपत्ती व्यवस्थापन, कृषी, वित्त आणि नागरी प्रशासन या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement