* सुज्ञ नागरिकांनी पुढे येण्याची गरज ; शाळा वाचवण्यासाठी समित्या सक्रिय होणे अत्यावश्यक
जळगांव / प्रतिनिधी :- फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज जिल्हा परिषदांच्या प्राथमिक मराठी शाळांसमोर अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या घटत असून, अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गांवर असल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे.
आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षणाच्या शोधात खाजगी किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळत आहेत. स्पर्धात्मक वातावरणात मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने गावातील मराठी शाळांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे जि. प. शाळांमधील विद्यार्थीसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
शाळांमध्ये असलेली शालेय व्यवस्थापन समिती (SMC) अनेक ठिकाणी केवळ नावापुरती राहिल्याचे दिसते. या समित्यांनी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सक्रिय भूमिका घेणे अपेक्षित असतांना, त्या निष्क्रिय असल्याची खंत व्यक्त होत आहे.
विद्यार्थीसंख्या घटत गेल्यास अनेक शाळा बंद पडण्याची शक्यता आहे. शाळा बंद झाल्यानंतर त्यांच्या जागांवर अतिक्रमण होण्याचा धोका निर्माण होतो. काही ठिकाणी शाळांच्या जागेवर दुकानदारी उभी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहेत. भविष्यात शाळांचे मैदान बाजारपेठेत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूर्वी गावातील शिक्षणासाठी अनेकांनी स्वतःच्या जमिनी दान करून किंवा विकत घेऊन शाळा उभारल्या. त्या जागांची नोंद आजही शासकीय रेकॉर्डमध्ये शाळांच्या नावावर आहे. मात्र आज काही ठिकाणी त्याच जागांचा गैरवापर होत असल्याचे चित्र चिंताजनक आहे.
या परिस्थितीत गावातील सुज्ञ नागरिक, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे अत्यंत आवश्यक आहे. शाळेची गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांना आकर्षित करणे आणि शाळेच्या जागेचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जर शाळेत शिक्षकांकडून अपेक्षित शिक्षण दिले जात नसेल, तर शालेय व्यवस्थापन समितीने त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ औपचारिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, शिक्षणाची गुणवत्ता आणि शाळेचा विकास यासाठी समित्यांनी सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.


Post a Comment
0 Comments