* 30 आमदार व मंत्र्यांच्या नावांची चर्चा
* एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा
* राज्यातील राजकारणात मोठा भूकंप शक्य ?
* SIT तपासात वाढते धक्कादायक खुलासे
जळगाव - मुंबई / प्रतिनिधी :- कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात तब्बल 30 आमदार आणि काही कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांची चर्चा सुरू असल्याचा गंभीर दावा राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अशोक खरात प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यास राज्यातील सत्तास्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि सरकारही कोसळू शकते, असे खडसे यांनी स्पष्ट केले. जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला असून या प्रकरणाची व्याप्ती अत्यंत मोठी असल्याचे त्यांनी सूचित केले.
* 30 हून अधिक आमदार, मंत्र्यांची नावे चर्चेत :- खडसे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात 30 पेक्षा अधिक आमदार आणि काही कॅबिनेट मंत्र्यांची नावे समोर येत आहेत. जर या नावांमागील प्रत्यक्ष सहभाग सिद्ध झाला, तर राज्याच्या राजकारणात मोठा ‘भूकंप’ होण्याची शक्यता आहे.
अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांचे शोषण, आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय संबंध यांसारख्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. तपास यंत्रणा या सर्व बाबींचा सखोल तपास करीत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
* राजकीय आरोप-प्रत्यारोपांना ऊत :- दरम्यान, या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काही नेत्यांनी खरातच्या संपर्कात अनेक आमदार आणि मंत्र्यांचे संबंध असल्याचा दावा केला आहे. काही वक्तव्यांनुसार, 39 आमदार आणि 9 मंत्र्यांचा खरातशी संपर्क होता, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
* प्रकरण दडपण्याचा संशयही व्यक्त :- खडसे यांनी या प्रकरणावर बोलतांना गंभीर शंका व्यक्त केली आहे की, अशा मोठ्या प्रकरणांना काही कारणे देऊन दडपण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
* लग्नसोहळ्यांतही राजकीय उपस्थिती ? :- खरातच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमांमध्ये अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. लग्नपत्रिकेत काही नेत्यांची नावे असल्याचेही सांगितले जात आहे, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक व्यापक असल्याचे संकेत मिळत आहेत.
एकंदरीत, अशोक खरात प्रकरण हे केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता आता राजकीय वादळात रूपांतरित झाले आहे. या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Post a Comment
0 Comments