Type Here to Get Search Results !

'खाकी'चे नगरदेवळेकरांकडून 'डिजे'च्या जल्लोषात स्वागत

* नगरदेवळ्यात संगीता पाटील व वैभव पवार यांचा सत्कार 

* संघर्षातून यश मिळवलेल्या तरुणाईला ग्रामस्थांचा सलाम

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :-  "अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है..."या प्रसिद्ध डायलॉगप्रमाणे जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न साकार होत असल्याचा जिवंत अनुभव नगरदेवळा ग्रामस्थांनी घेतला. पोलिस भरतीत यश मिळविलेल्या संगीता संदीप पाटील आणि वैभव दिलीप पवार या दोन तरुणांचे गावात डिजेच्या जल्लोषात आणि गुलाल उधळत भव्य स्वागत करण्यात आले.

आज रविवार, 29 मार्च 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता कालिका माता मंदिरापासून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. ग्रामस्थांनी ‘डिजे’च्या तालावर नाचत, गुलाल उधळत दोन्ही यशवंतांचे स्वागत केले. ठिकठिकाणी औक्षण करून मान्यवरांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

* संघर्षातून उभी राहिलेली ‘संगीता’ची प्रेरणादायी कहाणी :- संगीता संदीप पाटील ही केवळ 19 वर्षांची तरुणी…पण तिचा संघर्ष मोठा आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने आईने अत्यंत कष्टाने तिचे संगोपन केले. मामाच्या गावी तीने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले, मजुरी करून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलला. छत्रपती संभाजीनगर येथे प्रशिक्षण घेत कठोर मेहनत केली, या सगळ्या संघर्षाचे फळ म्हणून पहिल्याच प्रयत्नात पोलीस दलात तीची निवड झाली. तिच्या यशाने आईच्या कष्टांचे चीज झाले.


* वैभव पवारची जिद्दही ठरली यशाची गुरुकिल्ली :- दिलीप नामदेव पवार यांचा मुलगा वैभव पवार यानेही कठोर मेहनतीने पोलिस भरतीत यश मिळवले. पहाटेपासून मैदानी सराव, रात्री उशिरापर्यंत अभ्यास, सतत मार्गदर्शन घेऊन त्याने तयारी केली. अपयशाची भीती न बाळगता सातत्याने मेहनत करीत त्याने बुलढाणा पोलीस दलात स्थान मिळवले.

* मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव :- या प्रसंगी भाजप नेते प्रणय (मुन्ना) दिलीप भांडारकर यांनी दोन्ही यशस्वी तरुणांचा सत्कार केला. यावेळी इंद्रनील भामरे, विलास भामरे, आदित्य परदेशी, कडू नाना पाटील, कैलास सोन्नी, दिलीप पवार यांच्यासह शेकडो ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. तसेच सरदार एस. के. पवार विद्यालयाचे शिक्षक उमेश काटकर यांनी सपत्नीक सत्कार करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबत सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थांनी दोन्ही 'धुरंधरां'ना शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


* नगरदेवळा येथील तरुणींसाठी प्रेरणादायी यश :- संगीता पाटीलच्या यशाने नगरदेवळ्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 50-60 तरुणींना नवी प्रेरणा मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत गावातील अनेक तरूणी या अतिशय कमी गुणांनी भरती होवू शकलेल्या नाहीत. परंतु संगिताचे यश हे या तरूणींसाठी प्रेरणादायी ठरेल. अपयशाने खचून न जाता नव्या जिद्दीने पुन्हा प्रयत्न करा, असा संदेश संगीताच्या यशाने दिला आहे.


* भावनिक क्षण...गावाचा अभिमान :- या यशस्वी तरुण-तरुणींच्या स्वागतावेळी संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या डोळ्यांत अभिमान आणि प्रेरणेची चमक दिसत होती. संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ‘खाकी’ मिळवणाऱ्या संगीता पाटील आणि वैभव पवार यांचा हा प्रवास केवळ यशाची कहाणी नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement