Type Here to Get Search Results !

अशोक खरात प्रकरणात व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर पोलिसांचा शिकंजा

* तिघांवर गुन्हा दाखल, थेट अटकेचा इशारा

* सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणे गुन्हा ठरणार

* पीडित महिलांची ओळख उघड करणाऱ्यांवर कठोर कारवाई

नाशिक / प्रतिनिधी :- नाशिकमध्ये भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. पीडित महिलांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत कडक इशारा दिला आहे.

* व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल :- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव तसेच बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील संदीप गरजे या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संशयितांनी अश्लील व्हिडीओ शेअर करून पीडित महिलांची ओळख उघड केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६७ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


* व्हिडीओ शेअरिंगची साखळी उघड :- पोलिस तपासात व्हिडीओ शेअरिंगची संपूर्ण साखळी समोर आली आहे. संदीप गरजे, योगेश आढाव, राहुल शिंदे अशा पद्धतीने हे व्हिडीओ एकमेकांना पाठविण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.


* पोलिसांचा कडक इशारा :- या प्रकरणानंतर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पीडित महिलांची ओळख उघड करणारे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करू नयेत. अश्लील किंवा संवेदनशील सामग्री तात्काळ डिलीट करावी. सोशल मीडियावर प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तींसह ग्रुप ॲडमिनवरही गुन्हा दाखल होईल, अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी आढळल्यास थेट अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


* संवेदनशीलतेची गरज :- या घटनेमुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आला आहे. गुन्ह्याच्या बातमीपेक्षा पीडितेची गोपनीयता जपणे अधिक महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणे हे केवळ अनैतिकच नव्हे, तर कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशोक खरात प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेली ही कठोर भूमिका ही सोशल मीडियावर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांसाठी मोठा इशारा ठरत आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागून पीडितांच्या सन्मानाचे रक्षण करणे हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement