* कला व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल, नाशिकमध्ये दिमाखदार सोहळा
नाशिक / प्रतिनिधी :- ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक यांच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात राज्यस्तरीय ‘छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026’ उत्साहपूर्ण वातावरणात प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठित पुरस्काराने खोपोली (ता. खालापूर, जि. रायगड) येथील सुप्रसिद्ध लोककलावंत, अभिनेते आणि लावणीसम्राट सुरेश शहाजी साठे यांचा गौरव करण्यात आला.
सुरेश साठे यांनी अनेक वर्षांपासून पारंपरिक लावणी, लोककला आणि भारूड यांचे प्रभावी सादरीकरण करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले आहे. स्त्री-पुरुष विविध भूमिका साकारत त्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लोककलेचा प्रसार आणि समाजात कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान विशेष कौतुकास्पद ठरले आहे.
या सोहळ्यात साठे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम, गोल्ड मेडल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम 24 मार्च 2026 रोजी गांजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात दिमाखात पार पडला.
कार्यक्रमाला शिवव्याख्याते प्रा. सचिन देवरे पाटील, निसर्गोपचार तज्ञ डॉं. रावसाहेब घोडेराव, संस्थेचे अध्यक्ष डॉं. अनिल आठवले, सचिव मिलिंद कळवणकर, आयटकचे राज्य सचिव राजू देसले, संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ, पत्रकार जिजा दवंडे, चंद्रमणी पटाईत, विलास पांगारकर, डॉं. अविनाश शिंदे, नीलिमा साठे, डॉं. चंचल साबळे, रविंद्रकुमार गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे सुरेश साठे यांच्या कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून लोककलेच्या जतनासाठी काम करणाऱ्या कलाकारांना प्रेरणा मिळाली आहे.


Social Plugin