* 31 हजार दीपांनी उजळला परिसर ; रांगोळी स्पर्धा, भजन संध्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिमय वातावरण
कोराडी / मिलिंद गाडेकर :- कोराडी देवी मंदिर रोडवरील हनुमान मंदिर परिसरात आज सायंकाळी भव्य रामजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. युवामित्र मंडळ आणि महिला मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारी 4 वाजता हनुमान मंदिर ते देवी मंदिर चौक ते महादुला जगदंबा कमानीपर्यंत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महिला भगिनी आणि युवा मुलींनी साकारलेल्या आकर्षक व देखण्या रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी श्री आदिनाथ युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रुद्रप्रताप सिंह ठाकूर यांनी पूजा-अर्चना केली. या प्रसंगी महादुला नगरपंचायतीच्या अध्यक्ष हेमलता मनोज सावजी, नगरसेविका, कोराडीचे माजी सरपंच नरेंद्र धानुले, माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संध्याकाळ होताच संपूर्ण परिसरात तब्बल 31 हजार दीप प्रज्वलित करण्यात आले. या दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला आणि वातावरण अधिक भक्तिमय झाले. सायंकाळी 7 वाजता भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम भजन संध्या आणि गायन कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक गोपाल नईकाणे, अजय सोलंकी, दीपक जैन, नगरसेविका स्वाती लांडे, कुणाल भोस्कर, हर्षल हिंगणेकर, भाजप गटनेते अभिजित ढेंगरे, जितू भगत, बापू सोनवणे, नगरसेवक प्रीतम लोहसारवा, भाजप शहराध्यक्ष सचिन पाटील, जितू लोहसर्वा यांसह अनेकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.


Post a Comment
0 Comments