Type Here to Get Search Results !

छोट्या पक्षांनी रिपब्लिकन पक्षात विलीन व्हावे!

* केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

* मुंबईत मोठा राजकीय घडामोडी ; मिलिंद सुर्वे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई / प्रतिनिधी :- देशभरात रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट करण्यासाठी छोट्या पक्षांनी, विविध गटांनी आणि संघटनांनी एकत्र येऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) मध्ये विलीन व्हावे, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील एकसंध रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी सर्व आंबेडकरी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध गटांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी अधोरेखित केले. “वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून न राहता सर्वांनी निळा झेंडा हाती घेऊन रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा,” असे त्यांनी सांगितले.


या पत्रकार परिषदेत मोठी राजकीय घडामोड घडली. पिपल्स रिपब्लिकन पक्ष (महाराष्ट्र) चे अध्यक्ष मिलिंद सुर्वे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशावेळी मंगेश पगारे, डॉं. उमेश पवार, अशोक तांबे, शशिकांत शिंदे, मोहन बोदडे, भीमसेन जाधव, गोविंद साळवी, विक्रम बमना, विजय पंडागळे, तुकाराम हेगडे, चंद्रकांत रुपेकर, कविताताई निकम, फिरोज शेख, राजू पांचाळ, सारिका सकपाळ, माधव कट्टार यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ. रश्मी जीवन जाधव यांनी आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.


रामदास आठवले यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्ष सध्या देशभरात विस्तारत असून नागालँड आणि मणिपूरमध्ये पक्षाला मान्यता मिळाली आहे. आणखी दोन राज्यांमध्ये मान्यता मिळाल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. “भाजप, काँग्रेस, बसपा आणि आम आदमी पक्षानंतर रिपब्लिकन पक्षही राष्ट्रीय स्तरावर उभा राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला ‘गन्ना किसान’ हे चिन्ह दिले असून आसाम, तामिळनाडू आणि केरळमध्ये पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर पाँडिचेरी आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला पाठिंबा देण्यात येत असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.


या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement