Type Here to Get Search Results !

‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेसचे राज्याला लोकार्पण

* 3000 अत्याधुनिक एसटी बस ताफ्यात दाखल

* सीसीटीव्ही, जीपीएस, पॅनिक बटणासह प्रवास होणार अधिक सुरक्षित व आरामदायी

मुंबई / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात तब्बल 3000 ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेस दाखल करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विधान भवन, मुंबई येथे पार पडला. या बसची पाहणी करीत मुख्यमंत्र्यांनी स्वतः बसमधून प्रवास करून सुविधांचा आढावा घेतला.

एसटीच्या ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’ आणि ‘हिरकणी’ या गौरवशाली बससेवांनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने अत्याधुनिक बससेवा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा उपक्रम मानला जात आहे.


या स्मार्ट बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, पॅनिक बटण, सार्वजनिक घोषणा प्रणाली (Public Announcement System), इलेक्ट्रॉनिक साईनेज / मार्गदर्शक फलक अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या सुविधांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सोयीस्कर होणार आहे.


* आसन क्षमता वाढली :- जुन्या बसेसमध्ये केवळ 40 आसने होती, तर नव्या बसमध्ये 3x2 आसनरचना असून एकूण 56 आसने असतील. यामुळे अधिक प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा लाभ मिळणार आहे.


* नागपूरपासून सेवेला प्रारंभ :- या बसेसची सुरुवात नागपूरमध्ये 50 बसेसपासून करण्यात येणार आहे. पुढे राज्यभर टप्प्याटप्प्याने या बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. गर्दीच्या भागांमध्ये या बसेस शटल सेवा म्हणूनही चालविण्यात येतील, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.


या लोकार्पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, पंकजा मुंडे, दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement