* भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांची उपस्थिती ; कला पथकाच्या झाकीने वेधले लक्ष
सिरसी (ता. उमरेड) / अखिल रोडे :- परमहंस श्री संत रंगनाथ बाबा यांच्या पुण्यस्मरणोत्सवानिमित्त आयोजित ‘शिव महापुराण कथा सप्ताह’ व ‘संगीतमय ज्ञानयज्ञ सोहळा’ नुकताच मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाची सांगता सोमवारी भव्य महाप्रसादाने करण्यात आली असून हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला.
* 'कृतीमय बोलकी झाकी’ ठरली मुख्य आकर्षण :- या सोहळ्यात ‘राधे-राधे कला मंडळ, सासरा (सानगडी)’ यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या ‘कृतीमय बोलकी झाकी’ने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. कलाकारांनी सादर केलेले जिवंत देखावे, सादरीकरणातील भावपूर्णता आणि कलात्मकता यामुळे कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. अतुल नारनवरे, संजय डुंभरे, खेमराज गायधने, आनंद वैद्य, प्रफुल वासनिक, विदेश बोरकर, गोपाल गोटेफोडे, रामाजी राऊत, जगदीश पोहनकर, युगांत गोटेफोडे, मयूर घरत, पराग उप्रिकर, नयन आखडे आदी कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली.
* 'गब्बर का मेला’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू :- यात्रेच्या निमित्ताने लहान मुलांसाठी विविध पाळणे, खेळणी आणि मनोरंजनाचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. विशेषतः ‘गब्बर का मेला’ आणि झुलणारे पाळणे हे आकर्षण ठरले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या मनोरंजनाचा आनंद घेतला.
* ह.भ.प. नरेशजी महाराजांचे प्रभावी प्रवचन :- ह.भ.प. नरेशजी महाराज निंबेकर यांच्या रसाळ वाणीतून सादर करण्यात आलेल्या शिव महापुराण कथेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथेचे श्रवण केले.
* लोकसहभागातून यशस्वी आयोजन :- या भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सिरसी गावातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी मोठे सहकार्य केले. श्रमदान आणि आर्थिक मदतीच्या माध्यमातून सर्वांनी हातभार लावत कार्यक्रम यशस्वी केला.
* पोलिस प्रशासनाचा कडक बंदोबस्त :- कार्यक्रमादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ठाणेदार उमेश नासारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक खंडेराव बोडगिर, असलम नवरागाबांदे, अमोल कोटेवार, निलेश बिजवाड, ओम राठोड, राजेंद्र रंगारी आणि सोनू चटप यांच्या पथकाने अहोरात्र परिश्रम घेत सुरक्षितता सुनिश्चित केली. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.


Social Plugin