Type Here to Get Search Results !

'इस्रो शास्त्रज्ञ’ बनून महिलांची फसवणूक

* नवी मुंबईतील भामट्याचा 50 पेक्षा अधिक महिलांना गंडा

* लग्नाच्या आमिषाने शारीरिक संबंध, लाखो रुपयांची उकळपट्टी, 12 बनावट नावांनी राज्यभर कारनामे

नवी मुंबई / प्रतिनिधी :- नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणाने राज्य हादरलेले असतानाच नवी मुंबईत महिलांच्या लैंगिक व आर्थिक शोषणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचे भासवून उच्चशिक्षित महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या आदर्श म्हात्रे या 35 वर्षीय भामट्याला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

केवळ दहावी शिक्षण घेतलेल्या आदर्श म्हात्रेने विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळांवर व सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार केली होती. कधी इस्रोचा शास्त्रज्ञ, तर कधी पीडब्ल्यूडी अधिकारी, तर कधी आयएएस-आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून तो महिलांचा विश्वास संपादन करत असे. विशेष म्हणजे, तो प्रामुख्याने 30 वर्षांवरील अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना लक्ष्य करीत असे.


आलिशान गाड्या, पंचतारांकित हॉटेल्स आणि उच्चभ्रू जीवनशैली दाखवून तो महिलांना प्रभावित करत असे. त्यानंतर लग्नाच्या भूलथापा देत त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असे. यानंतर पैशांची गरज असल्याचे सांगून लाखो रुपयांची उकळपट्टी करणे हा त्याचा ठरलेला डाव होता. पीडित महिलांचा पूर्ण विश्वास जिंकल्यानंतर आदर्श त्यांना 35 ते 40 लाखांचे होम लोन काढायला भाग पाडत असे. हे पैसे तो आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळवून नंतर फरार होत असे. लुबाडलेले पैसे तो गोवा आणि इतर ठिकाणी मौजमजेसाठी खर्च करीत असल्याचे तपासात समोर आले आहे.


आदर्श म्हात्रेने केवळ नवी मुंबईतच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नांदेड तसेच कर्नाटकातही महिलांना फसवले आहे. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी 40 ते 50 गुन्हे दाखल झाले असून, प्रत्यक्ष पीडितांचा आकडा याहून अधिक असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


* 12 बनावट नावांनी फसवणूक :- पोलिस तपासात आदर्शने अनेक खोट्या नावांचा वापर केल्याचे उघड झाले आहे. त्यात स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, रुद्रेश गोंधळी, जयेश सोनवणे, जयेश नाईक, आदित्य म्हात्रे, तन्मय म्हात्रे यांसारख्या नावांचा समावेश आहे. प्रत्येकवेळी नवीन ओळख निर्माण करून तो महिलांना फसवत असे.


* 'मोडस ऑपरेंडी’ स्पष्ट :- विवाह संकेतस्थळांवरून महिलांची निवड करून स्वतःला उच्चपदस्थ अधिकारी/शास्त्रज्ञ म्हणून सादर करीत असे. आलिशान जीवनशैली दाखवून विश्वास जिंकत असे, मग प्रेमाच्या नावाखाली शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. आर्थिक मदतीच्या नावाखाली लाखो रुपये उकळून फरार होत असे.


* पोलिसांचे आवाहन :- गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी महिलांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विवाह संकेतस्थळांवरील व्यक्तींची संपूर्ण खातरजमा केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत, तसेच कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement