* धाराशीव लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
* शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनाला नवी चालना
* कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, पक्ष बळकटीची अपेक्षा
जळगांव / फिरोज पिंजारी :- शिवसेना (शिंदे गट) मध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी खासदार उन्मेश पाटील यांना पक्षाने मोठी जबाबदारी देत धाराशीव लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय व सामाजिक क्षेत्रात त्यांच्या कार्याची दखल घेतल्याचे मानले जात आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि आनंद दिघे यांच्या प्रेरणेचा प्रभाव जपत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने उन्मेश पाटील यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास दाखवत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. उन्मेश पाटील यांनी आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून सर्वसामान्य नागरिकांशी मजबूत संपर्क प्रस्थापित केला आहे. त्यांची कार्यपद्धती, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि संघटन उभारणीची क्षमता लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
धाराशीव लोकसभा मतदारसंघात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी उन्मेश पाटील प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे. या नियुक्तीनंतर स्थानिक पातळीवर पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग येणार असल्याचे मानले जात आहे.
* विश्वास सार्थ ठरवणार - उन्मेश पाटील :- नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देतांना उन्मेश पाटील म्हणाले की, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांवर चालत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
उन्मेश पाटील यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. धाराशीव लोकसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी ते आक्रमक भूमिका घेतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Post a Comment
0 Comments