रायगड / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगडमधील एका कार्यक्रमातील पोस्टरवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची छायाचित्रे नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी विरोधकांसह पक्षांतर्गतही नाराजी व्यक्त होत असतांना, मंत्री आदिती तटकरे यांनी दिलगिरी व्यक्त करीत “बॅनरवरील फोटोतून आमची निष्ठा ठरवू नये” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
रायगड मतदारसंघातील नवनियुक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन स्थानिक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या बॅनरवर केवळ सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील सदस्यांची छायाचित्रे झळकली, तर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांचे ज्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांचे फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. या प्रकारामुळे विरोधकांनी तटकरे कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली. तसेच राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान राखला गेला नाही, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत होती.
* आदिती तटकरे यांची दिलगिरी आणि स्पष्टीकरण :- वाद वाढल्यानंतर आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांकडून अनेक कार्यक्रम घेतले जातात. अशाच एका कार्यक्रमात अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नसल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. त्यांचे आमच्या मनातील स्थान अढळ आहे. तसेच त्यांनी विरोधकांना टोला लगावत म्हटले की, बॅनरवरील फोटोतून आमच्या निष्ठेचे मूल्यांकन करू नये.
या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समन्वय आणि स्थानिक स्तरावरील नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, अशा छोट्या वाटणाऱ्या घटनाही पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करू शकतात आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात.
* वाद शमविण्याचा प्रयत्न, पण चर्चांना उधाण :- आदिती तटकरे यांच्या दिलगिरीनंतर हा वाद निवळण्याचा प्रयत्न झाला असला, तरी राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा सुरूच आहे. विशेषतः आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे ‘साधी चूक की मोठा संदेश ?’ अशा नजरेतून पाहिले जात आहे.


Post a Comment
0 Comments